Advertisement

राज्यभरात १ लिटरही दूध संकलित झालं नाही, राजू शेट्टींचा दावा

दूधकोंडी आंदोलनाला किसान सभेसह राज्यभरातील दूध उत्पादक, दूध कंपन्या आणि इतर शेतकरी संघटनांनी उस्फूर्त पाठिंबा दिला आहे. त्यामुळं राज्यभरात हे आंदोलन यशस्वी होताना दिसत आहे. राज्यात दिवसाला २ कोटी ४० लाख लिटर दूध संघटीत होतं, त्यातील १ कोटी ३० लाख लिटर दूध संघटीत क्षेत्राकडून संकलित केलं जातं. पण दूधकोंडी आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर अमूल, गोकूळ यांनी खबरदारी म्हणून सोमवारी दूध संकलनच केलं नाही.

राज्यभरात १ लिटरही दूध संकलित झालं नाही, राजू शेट्टींचा दावा
SHARES

गायीच्या दुधाला प्रति लिटर ५ रुपये अनुदान देण्याच्या मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेनं रविवारी रात्री १२ वाजल्यापासून राज्यभर दूधकोंडी आंदोलन सुरू केलं आहे. राज्यात दररोज २ कोटी ४० लाख लिटर दूध संकलित होतं. पण सोमवारी एक लिटरही दूध संकलित झालं नसल्याचा दावा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष खा. राजू शेट्टी यांनी 'मुंबई लाइव्ह'शी बोलताना केला. सोमवारी दूध संकलन झालंच नसल्यानं मंगळवारी मुंबईसह इतर मेट्रो शहरांना त्याचा फटका बसेल असंही त्यांनी स्पष्ट केलं.


कंपन्यांना धास्ती

दूधकोंडी आंदोलनाला किसान सभेसह राज्यभरातील दूध उत्पादक, दूध कंपन्या आणि इतर शेतकरी संघटनांनी उस्फूर्त पाठिंबा दिला आहे. त्यामुळं राज्यभरात हे आंदोलन यशस्वी होताना दिसत आहे. राज्यात दिवसाला २ कोटी ४० लाख लिटर दूध संघटीत होतं, त्यातील १ कोटी ३० लाख लिटर दूध संघटीत क्षेत्राकडून संकलित केलं जातं. पण दूधकोंडी आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर अमूल, गोकूळ यांनी खबरदारी म्हणून सोमवारी दूध संकलनच केलं नाही.



आंदोलन १०० टक्के यशस्वी

तर, अहमदनगर, सांगली, कोल्हापूर, पुणे, सोलापूर या भागात संघटीत आणि असंघटीत अशा दोन्ही प्रकारात दूध संकलन झालं नसल्याची माहिती दूधकोंडी आंदोलनाला पाठिंबा देणारे किसान सभेचे सरचिटणीस डाॅ. अजित नवले यांनी दिली. तर शेट्टी यांनी देखील सोमवारी एक लीटरही दूध संकलित झालं नसून आंदोलन १०० टक्के यशस्वी होत असल्याचा दावा केला आहे.


३ दिवसांचाच दूधसाठा

दरम्यान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुंबईसह राज्यात दूध कमी पडू देणार नसल्याचं आश्वासन दिलं आहे. तर मुंबईत वारणाकडून दूध पुरवठा केला जात असून ३ दिवस पुरेल इतका दूध पुरवठा असल्याचं म्हटलं जात आहे. पण शेट्टी यांनी सरकार असं सांगत मुंबईकरांची फसवणूक करत असल्याचं म्हटलं आहे. एवढंच नाही, तर वारणानं ३ दिवसांसाठीचं दूध आहे का हे दाखवावं, असं आव्हानही त्यांनी केलं.

मुंबईत दूधकोंडी होऊ नये म्हणून सरकार शहरात दूध आणण्याचा कितीही प्रयत्न करो, आमचे आंदोलकही बघून घेतील मुंबईत दूध कसं पोहोचतं असं म्हणत शेट्टी यांनी सरकारला थेट आव्हानच दिलं आहे. त्यामुळं मंगळवारपासून मुंबईत दुधाची टंचाई निर्माण होण्याची शक्यता आता दाट झाली आहे.


सटरफटर लोक काहीही म्हणोत...

निवडणुका डोळ्यांसमोर ठेवत दूधकोंडी आंदोलन सुरू असल्याचं म्हणत कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी दूध आंदोलनावर निशाणा साधला आहे. दूध आंदोलकांकडून जे दूध रस्त्यावर ओतलं जात आहे, त्यात किती पाणी आहे, हे देखील आपल्याला माहीत असल्याचं म्हणत या आंदोलनाची खिल्लीही खोत यांनी उडवली. यावर प्रतिक्रिया देताना शेट्टी यांनी किरकोळ, सटरफटर लोक काहीही म्हणोत, त्यांच्या म्हणण्याला मी भाव देत नाही, असा प्रतिटोला हाणला.


पावडर दुधाचा पर्याय

येत्या एक-दोन दिवसांत मुंबईकरांना दुधटंचाई भासू शकतो. त्यामुळं सरकारकडून पर्यायी व्यवस्था म्हणून पावडरचं दूध उपलब्ध करून दिलं जाण्याची शक्यता होत आहे. डाॅ. नवले यांनी देखील या वृत्ताला दुजोरा दिला.


दूध रोखणाऱ्याविरोधात कारवाई करा

मुंबईचं दूध रोखत मुंबईकरांना वेठीस धरणाऱ्या आंदोलकांविरोधात कडक कारवाई करा, असं म्हणत मुंबई ग्राहक पंचायतीनंही या वादात उडी घेतली आहे. ग्राहक पंचायतीचे कार्याध्यक्ष अॅड. शिरीष देशपांडे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना एक पत्र लिहित आंदोलकांवर कारवाई करण्याची मागणी केली आहे. टँकर्सना आग लावणं, दूध फेकून देणं योग्य नसल्यानं मुख्यमंत्र्यांनी यात हस्तक्षेप करत यातून मार्ग काढावा असंही ग्राहक पंचायतीचं म्हणणं आहे. दुधाचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी तज्ञांची समिती नेमावी असंही या पत्रात नमूद करण्यात आलं आहे.



हेही वाचा-

मुंबईकरांनो, आज जरा जास्तीचंच दूध खरेदी करा...

मुंबईला दूध कमी पडू देणार नाही- महादेव जानकर



संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा