Advertisement

आयपीएलमध्ये 'या' खेळाडूंनी घेतल्या भन्नाट कॅच


आयपीएलमध्ये 'या' खेळाडूंनी घेतल्या भन्नाट कॅच
SHARES

इंडियन प्रीमियर लीगच्या (आयपीएल) प्रत्येक पर्वात अनेक खेळाडूंची विक्रमी खेळी पाहायला मिळते. दरवर्षी नवा खेळाडू हा सर्वोत्कृष्ट गोलंदाज आणि फलंदाज म्हणून जन्माला येतो. त्याशिवाय सर्वाधिक धावा, षटकार आणि विकेट्स घेणारे नवे खेळाडूही पाहायला मिळतात. याचसोबत उत्कृष्ट असं क्षेत्ररक्षण करत अप्रतिम झेल घेणारेही खेळाडू पाहयला मिळतात. यंदाही अनेक खेळाडूंनी अप्रतिम झेल घेत प्रेक्षकांना आश्चर्यचकीत केलं आहे. 

संजू सॅमसन - राजस्थान रॉयल्स


कोलकाता विरुद्ध राजस्थान यांच्यात झालेल्या सामन्यात राजस्थानचा फलंदाज संजू सॅमसन यानं एक झेल घेतला तो खूपच चर्चेत आला. टॉम करन १८वं षटक टाकत होता. षटकातील शेवटचा चेंडू करनने टाकला. चेंडूच्या उसळीमुळे समोर उभ्या असलेल्या पॅट कमिन्सला तो चेंडू नीट टोलवता आला नाही. त्यामुळे त्याने केवळ बॅट फिरवली. त्यामुळे चेंडू बॅटला लागून हवेत उंच उडाला. चेंडू सीमारेषेच्या जवळ जात असतानाच संजू सॅमसनने अप्रतिम झेप घेत तो कॅच झेलला. पण झेल घेताना संजूचं डोकं जमिनीवर आदळलं. महत्त्वाची बाब म्हणजे असं घडूनही त्याने चेंडू हातून सोडला नाही.

युजवेंद्र चहल - रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू

बंगळुरू आणि राजस्थान यांच्यात झालेल्या सामन्यात बंगळुरूचा फिरकीपटू युजवेंद्र चहल यानं सामन्याच्या चौथ्या षटकात फलंदाज संजू सॅमसनसमोर चेंडू टाकला. तो चेंडू सॅमसनने समोर ढकलला. चेंडू चहलच्या दिशेनं जात असतानाच चहलनं अतिशय चपळतेनं आपल्या उजव्या दिशेला झेप घेत त्याचा झेल टिपला. चेंडू जमिनीला लागतो की काय असं वाटत असतानाच त्याने तो झेल घेतला.

शिखर धवन - दिल्ली कॅपिटल्स


दिल्ली कॅपिटल्स आणि कोलकाता नाईट रायडर्स यांच्यात झालेल्या अतिशय रोमांचक सामन्यात दिनेश कार्तिकला मोठा फटका खेळण्याचा मोह आवरवा नाही. त्यानं षटकार मारण्याच्या उद्देशानं हवाई फटका खेळला. त्याने मारलेला चेंडू धवनपासून लांब होता, पण त्यानं अप्रतिम झेप घेत चेंडू झेलला आणि त्याला ६ धावांवर माघारी धाडलं.

मनीष पांडे - सनरायझर्स हैदराबाद


सनरायझर्स हैदराबाद विरुद्ध मुंबई इंडियन्स यांच्यात झालेल्या सामन्यात मनीष पांडेने घेतलेला झेल खूपच चर्चेत राहिला. इशान किशन दमदार फटकेबाजी करत संघाची धावसंख्या वाढवण्याचा प्रयत्न करत होता. १५व्या षटकाच्या शेवटच्या चेंडूवर संदीप शर्माने त्याला पायाजवळ चेंडू टाकला. इशान किशननं चेंडू हवेत मारला. चेंडू चौकार जाणार असं वाटत असतानाच अचानक मनिष पांडेने सीमारेषेच्या नजीक झेल घेण्यासाठी झेप घेतली आणि अप्रतिम असा झेल टिपला.

इशान किशन - मुंबई इंडियन्स


सनरायझर्स हैदराबाद विरुद्ध मुंबई इंडियन्स यांच्यात झालेल्या सामन्यात मुंबईनं दिलेल्या २०८ धावांचा पाठलाग करताना कर्णधार डेव्हिड वॉर्नरही पॅटिन्सनच्या गोलंदाजीवर बाद झाला. विजयासाठी आवश्यक धावगती वाढत जात असल्यानं वॉर्नरनं बाहेरचा चेंडू फटकावण्याचा प्रयत्न केला आणि त्याच वेळी इशान किशनकडं अप्रितम झेल टिपत त्याला बाद केलं.

अनुकूल रॉय - मुंबई इंडियन्स 


राजस्थान रॉयल्स विरुद्ध मुंबई इंडियन्स यांच्यात झालेल्या सामन्यात मुंबईनं राजस्थानसमोर विजयासाठी १९४ धावांचं आव्हान ठेवलं. या धावांचा पाठलाग करताना यष्टीरक्षक जोस बटलर आणि महिपाल लोमरोर यांनी भागीदारी करत संघाचा डाव सावरण्याचा प्रयत्न केला. परंतू राहुल चहरच्या गोलंदाजीवर मोठा फटका खेळण्याच्या प्रयत्नात लोमरोर झेलबाद झाला. मुंबईकडून बदली खेळाडू म्हणून मैदानावर आलेल्या अनुकूल रॉयने लोमरोरचा सुरेथ झेल पकडत राजस्थानला आणखी एक धक्का दिला. 

कायरन पोलार्ड - मुंबई इंडियन्स 


राजस्थान रॉयल्स विरुद्ध मुंबई इंडियन्स यांच्यात झालेल्या सामन्यात १३व्या षटकात जेम्स पॅटिन्सन गोलंदाजी करत होता. षटकाच्या तिसऱ्या चेंडूवर जोस बटलरनं अतिशय महत्त्वाकांक्षी फटका खेळला. चेंडू जवळपास षटकार जाणार असं साऱ्यांनाच वाटत होतं पण त्याच वेळी कायरन पोलार्डनं जादू केल्यासारखा तो झेल टिपला. चेंडू सीमारेषेच्या जवळ आलेला असताना पोलार्डनं हवेत झेप घेतली आणि चेंडू आत ढकलला. त्यानं ढकललेला चेंडू पाहता झेल सुटतो की काय असा साऱ्यांचा अंदाज होता, पण पोलार्डनं अतिशय सुरेख पद्धतीनं तो झेल टिपला.

रविंद्र जाडेजा - चेन्नई सुपर किंग्ज


चेन्नई सुपर किंग्ज आणि कोलकाता नाईट रायडर्स यांच्यातील सामन्यात जाडेजा-डु प्लेसिस यांच्या जोडीनं एक भन्नाट कॅच घेतला. फटकेबाजीसाठी प्रसिद्ध असलेल्या सुनिल नारायणला चौथ्या स्थानावर पाठवलं. काही सुरेख फटके खेळत नारायणनं चांगली सुरुवातही केली. परंतू फिरकीपटू कर्ण शर्माच्या गोलंदाजीवर मोठा फटका खेळण्याच्या प्रयत्नात तो माघारी परतला. रविंद्र जाडेजानं धावून जात नारायणचा सुरेख झेल पकडला. परंतू झेल पकडल्यानंतर फॉलो-थ्रूमध्ये आपण सीमारेषा ओलांडत आहोत याचा अंदाज येताच जाडेजानं डु-प्लेसिसकडं तो झेल दिला.

महेंद्रसिंह धोनी - चेन्नई सुपर किंग्ज


कोलकाता नाईट रायडर्सविरुद्ध सामन्यात कोलकाताच्या अखेरच्या फळीत शिवम मवी फलंदाजी करत असताना धोनीनं धावा जावू नयेत यासाठी एक ग्लोव्ह्ज काढून किपींक करणं पसंत केलं. त्यानंतर, ब्राव्होच्या गोलंदाजीवर मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न करायला गेलेल्या शिवम मवीच्या बॅटची कड घेऊन चेंडू सीमारेषेकडं जात होता. परंतू धोनीनं हा सुरेख झेल पकडत मवीला माघारी धाडलं.

संजू सॅमसन - राजस्थान रॉयल्स


हैदराबाद आणि राजस्थान यांच्यातील सामन्यात दमदार कामगिरी करणाऱ्या जॉनी बेअरस्टोकडून संघाला खूप अपेक्षा होत्या. त्यानुसार नव्या दमाच्या कार्तिक त्यागीला त्याने १ षटकारदेखील खेचला, पण डावाच्या पाचव्या षटकात चौथ्या चेंडूवर बेअरस्टोने हवाई फटका खेळला. चेंडू सीमारेषेच्या दिशेने अतिशय वेगाने जमिनीच्या दिशेने जात होता, पण तेवढ्यात संजू सॅमसनने झेप घेत भन्नाट झेल टिपला.

सूर्यकुमार यादव - मुंबई इंडियन्स


ट्रेंट बोल्टच्या गोलंदाजीवर हल्लाबोल करण्याचा राहुल त्रिपाठीनं प्रयत्न केला. पहिला फटका उत्तम प्रकारे सीमारेषेपार गेला, पण पुढच्या चेंडू तो बाद झाला. बोल्टनं टाकलेला चेंडू राहुल त्रिपाठीनं पॉईंटच्या दिशेनं मारला. चेंडू वेगानं हवेत जात होता. तोच सूर्यकुमार यादवनं अप्रतिम झेप घेत त्याला झेलबाद केलं. चेंडू वेगानं जात असल्यामुळं झेल टिपला जाईल असं बोल्टलाही वाटलं नव्हतं पण सूर्यकुमारनं झेल घेतला हे पाहिल्यावर गोलंदाज बोल्टही चकित झाला.

राहुल तेवतिया - राजस्थान रॉयल्स

राजस्थान रॉयल्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्यात झालेल्या सामन्यात बंगळुरूचा कर्णधार विराट कोहली यानं जोरात चेंडू मारला. परंतू, राजस्थानचा फिरकीपटू राहुल तेवतिया यानं अप्रतिम झेल घेत कोहलीला माघारी धाडलं.

ग्लेन मॅक्सवेल - किंग्ज इलेव्हन पंजाब


पंजाबच्या गोलंदाजांची धुलाई करत रोहितने मैदानात चौफेर फटकेबाजी केली. ४५ चेंडूत ८ चौकार आणि ३ षटकारांच्या सहाय्याने रोहितने ७० धावा केल्या. अखेरीस मोहम्मद शमीच्या गोलंदाजीवर अखेरच्या षटकांमध्ये रोहित उंच फटका खेळताना माघारी परतला. यावेळी सीमारेषेवर ग्लेन मॅक्सवेलने कॅच घेतल्यानंतर आपला तोल जातोय हे लक्षात घेऊन जिमी निशमकडे चेंडू फेकला..निशमने कॅच पकडल्यानंतर रोहित बाद होऊन माघारी परतला.

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा