Advertisement

चेन्नईकडून हैदराबादचा ‘सूर्यास्त’, सातव्यांदा आयपीएलच्या अंतिम फेरीत


चेन्नईकडून हैदराबादचा ‘सूर्यास्त’, सातव्यांदा आयपीएलच्या अंतिम फेरीत
SHARES

टी-२० सामना म्हणजे गोलंदाजांची अक्षरश: कत्तल. क्रिकेटच्या या झटपट प्रकारात गोलंदाजांना मात्र अपवादानंच हुकूमत गाजवण्याची संधी मिळते. मात्र आयपीएलच्या ११व्या मोसमातील क्वालिफायर-१ सामन्यात म्हणजेच उपांत्य लढतीत गोलंदाजांना ती संधी मिळाली. गोलंदाजांचं वर्चस्व राहिलेल्या या सामन्यात सनरायझर्स हैदराबादच्या गोलंदाजांनी चेन्नई सुपर किंग्सच्या फलंदाजांना शरणागती पत्करण्यास भाग पाडलं. पण फॅफ डू प्लेसिस सनरायझर्सवर भारी पडला.

पहिल्या डावावर चेन्नईने वर्चस्व गाजविल्यामुळे सनरायझर्सला २० षटकांत ७ बाद १३९ धावाच करता आल्या. पण फिरकीस अनुकूल असलेल्या वानखेडे स्टेडियमच्या खेळपट्टीवर सनरायझर्स विजयी होऊन अंतिम फेरीत मजल मारणार, असं वाटत असतानाच फॅफ डू प्लेसिसनं त्यांच्या घशातून विजयाचा घास हिरावून घेतला. नाबाद ६७ धावांची खेळी करून डू प्लेसिसनं चेन्नईच्या विजयावर दोन विकेट्सनी शिक्कामोर्तब केलं. या कामगिरीसह चेन्नईनं आयपीएलच्या इतिहासात सातव्यांदा अंतिम फेरीत धडक मारण्याची करामत केली आहे. आता पराभूत व्हावे लागले तरी सनरायझर्स अंतिम फेरीत खेळण्याची एक संधी मिळणार आहे.

सनरायझर्सची घसरगुंडी

उपांत्य फेरीसारख्या क्वालिफायर-१ सामन्यात सनरायझर्स हैदराबादला मात्र चांगली सुरुवात करण्यात अपयश आलं. सनरायझर्सचा ‘गब्बर’ शिखर धवनचा दीपक चहरने पहिल्याच चेंडूवर त्रिफळा उद्ध्वस्त केला. या धक्क्यातून सावरत नाही तोच चौथ्या षटकांत लुंगी निगडीने श्रीवत्स गोस्वामीला आपल्याच गोलंदाजीवर झेलबाद करत माघारी पाठवलं. शार्दूल ठाकूरनं कर्णधार केन विल्यम्सनचा (२७) अडसर दूर केला. त्यामुळे सनरायझर्सची अवस्था ३ बाद ३६ अशी झाली.


ब्राव्होची कमाल

रवींद्र जडेजाने मनीष पांडेला माघारी पाठवल्यानंतर ड्वेन ब्राव्होची कमाल पाहायला मिळाली. शाकिब अल हसन (१२) आणि युसूफ पठाण (२४) या सनरायझर्सच्या अव्वल फलंदाजांना बाद करत ब्राव्होनं चेन्नईला फ्रंटफूटवर आणलं. सनरायझर्सच्या फलंदाजांनी चेन्नईच्या गोलंदाजांसमोर अक्षरश: नांगी टाकली असताना कार्लोस ब्रेथवेट सनरायझर्ससाठी धावून आला.


ब्रेथवेटनं जान आणली

चेन्नईचे गोलंदाज वरचढ होत असतानाच कार्लोस ब्रेथवेटने सामन्यात रंगत आणली. अखेरच्या पाच षटकांत ब्रेथवेटचा रुद्रावतार पाहायला मिळाला. त्यानं ४३ चेंडूंत ४ षटकार आणि एका चौकाराची आतषबाजी करत नाबाद ४३ धावांची खेळी केली. त्याच्या या कामगिरीमुळे सनरायझर्स हैदराबादला २० षटकांत ७ बाद १३९ धावांपर्यंत झेप घेता आली.

चेन्नईचे फलंदाजही ढेपाळले

सनरायझर्सचं १४० धावांचं उद्दिष्ट चेन्नई सुपर किंग्स सहज पार करेल, असं वाटलं होतं. पण पहिल्या डावात चेन्नईच्या बाजूने झुकलेलं पारडं दुसऱ्या सत्रात सनरायझर्स हैदराबादच्या बाजुनं झुकेल, याची पुसटशी कल्पनाही मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर उपस्थित असलेल्या चाहत्यांना नव्हती. पण पहिल्याच षटकांत भुवनेश्वर कुमारनं शेन वॉटसनला बाद करत त्याची झलक दाखवून दिली.


सिद्धार्थ कौलनं दिले दोन धक्के

सुरेश रैना आणि फॅफ डू प्लेसिस हे चेन्नईचा डाव सावरतील, असं वाटत असतानाच मध्यमगती गोलंदाज सिद्धार्थ कौलनं चेन्नईला दोन हादरे दिले. चौथ्या षटकांत कौल यानं रैना (२२) आणि अंबाती रायडू (०) यांचे त्रिफळे उडवत सनरायझर्सला सामन्यात पुनरागमन करून दिलं. त्यानंतर लेगस्पिनर राशिद खान यानं महेंद्रसिंग धोनी (९) आणि ड्वेन ब्राव्हो (७) यांना बाद करत सनरायझर्सला मजबूत स्थितीत आणलं. संदीप शर्मा यानंही रवींद्र जडेजा (३) आणि दीपक चहर (१०) यांना आऊट करत चेन्नईला पराभवाच्या खाईत लोटलं.

डू प्लेसिस ठरला तारणहार

चेन्नईच्या सर्व फलंदाजांनी नांगी टाकली असताना सलामीला आलेल्या फॅफ डू प्लेसिसने अखेरपर्यंत किल्ला लढवला. सुरुवातीला सावध फलंदाजी करणाऱ्या डू प्लेसिसनं अखेरच्या क्षणी चौथा गिअर टाकत चौकार-षटकारांची बरसात केली. अखेरच्या दोन षटकांत २३ धावांची आवश्यकता असताना मुंबईकर शार्दूल ठाकूरनं सिद्धार्थ कौलला तीन चौकार ठोकत १७ धावा वसूल करत चेन्नईला विजयासमीप आणून ठेवलं. सहा चेंडूंत सहा धावांची गरज असताना डू प्लेसिसनं भुवनेश्वरला षटकार लगावत चेन्नईच्या विजयावर शिक्कामोर्तब केलं.

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा