Advertisement

प्रेक्षकांविना आयपीएल खेळवण्यास अजिंक्य रहाणेचं समर्थन

प्रेक्षकांविना आयपीएल खेळवण्याला मुंबईकर अजिंक्य रहाणेनंही दुजोरा दिला आहे.

प्रेक्षकांविना आयपीएल खेळवण्यास अजिंक्य रहाणेचं समर्थन
SHARES

कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर देशभरात लॉकडाऊन करण्यात आलं आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी केंद्र सरकारनं ३ मे पर्यंत लॉकडाउन वाढवलं आहे. रुग्णांची संख्या वाढत असल्यानं हे लॉकडाऊन आणखी काही वेळ वाढवण्याची शक्यता आहे. या लॉकडाऊनमुळं देशभरातील क्रीडा क्षेत्रालाही फटका बसला आहे. बीसीसीआयनं आपल्या सर्व महत्वाच्या स्पर्धा रद्द केल्या आहेत. आयपीएलचा तेरावा हंगाम बीसीसीआयने पुढील सूचना मिळेपर्यंत स्थगित केला आहे. मात्र काही आजी-माजी खेळाडू प्रेक्षकांविना आयपीएल खेळण्यास तयार आहेत.

प्रेक्षकांविना आयपीएल खेळवण्याला मुंबईकर अजिंक्य रहाणेनंही दुजोरा दिला आहे. 'आम्ही सर्वांनी स्थानिक क्रिकेट प्रेक्षकांविना खेळलं आहे, त्यामुळं आम्हाला याची सवय आहे. कोरोनामुळं सध्याची परिस्थिती लक्षात घेता चाहत्यांसाठीही ही गोष्ट योग्य आहे. आंतरराष्ट्रीय सामन्यांना येणारी गर्दी स्थानिक सामन्यांसाठी येत नाही. चाहत्यांची सुरक्षा ही आमच्यासाठी महत्वाची आहे. रिकाम्या मैदानावर सामने खेळवले जाणार असतील तर ते सर्वांसाठी योग्य ठरेल. आमचा याला पाठींबा आहे', अशी माहिती अजिंक्य रहाणेनं दिल्ली कॅपिटल्स संघाच्या इन्स्टाग्राम लाईव्ह चॅटमध्ये बोलताना दिली.

आयपीएलच्या १२व्या हंगामापर्यंत अजिंक्य रहाणे राजस्थान रॉयल्सचं प्रतिनिधीत्व करत होता. १३व्या हंगामासाठी राजस्थाननं Player transfer Window अंतर्गत अजिंक्यला दिल्लीच्या संघात दिलं. दरम्यान खेळाडू रिकाम्या मैदानावर सामने खेळण्यासाठी तयार असले तरीही बीसीसीआय अद्याप निर्णय घेण्याच्या तयारीत दिसत नाही आहे.

स्पर्धा रद्द झाल्यास बीसीसीआयला होणारं आर्थिक नुकसान हे मोठं असणार आहे, त्यामुळे आयसीसी दरबारी आयपीएल चा तेरावा हंगाम होण्यासाठी बीसीसीआयचे शर्थीचे प्रयत्न सुरु आहेत.

संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा