Advertisement

मुंबई इंडियन्सचं ‘पॅकअप’! दिल्ली डेअरडेव्हिल्सचा ११ धावांनी विजय


मुंबई इंडियन्सचं ‘पॅकअप’! दिल्ली डेअरडेव्हिल्सचा ११ धावांनी विजय
SHARES

प्ले-ऑफ फेरीचं तिकीट मिळवण्यासाठी मुंबई इंडियन्सच्या खेळाडूंनी गेल्या काही सामन्यांपासून केलेली प्रयत्नांची शर्थ अखेर आज संपुष्टात आली. प्रथम फलंदाजी करणाऱ्या दिल्ली डेअरडेव्हिल्सला २० षटकांत ४ बाद १७४ धावांवर रोखण्यात मुंबईच्या गोलंदाजांना यश आलं. हे उद्दिष्ट गाठताना इर्विन लुइसनं मुंबईला दमदार सुरुवातही करून दिली. पण दिल्ली डेअरडेव्हिल्सच्या लेगस्पिनर्सनी आपला इंगा दाखवल्यामुळे मुंबई इंडियन्सचा डाव पत्त्याच्या डावाप्रमाणे कोसळला. अखेरच्या क्षणी हार्दिक पंड्या आणि बेन कटिंग यांनी विजयासाठी निकराचे प्रयत्न केले. पण मुंबईचा डाव १६३ धावांवर संपुष्टात आणत दिल्लीने ११ धावांनी विजय मिळवला. या पराभवासह गतविजेत्या मुंबई इंडियन्सला यंदाच्या आयपीएलमधून ‘पॅकअप’ करावं लागलं आहे.


मुंबईची पडझड

दिल्लीने विजयासाठी ठेवलेले १७५ धावांचे आव्हान पार करताना मुंबईची सुरुवात चांगली झाली नाही. आतापर्यंत मुंबईसाठी सातत्यपूर्ण कामगिरी करणारा सूर्यकुमार यादव सुरुवातीलाच माघारी परतला. इर्विन लुइसने इशान किशनच्या साथीने मुंबईच्या डावाला आकार दिला. या दोघांनी दुसऱ्या विकेटसाठी ४५ धावा जोडल्या. मुंबई संघ विजयाच्या दिशेने कूच करत असताना दिल्लीच्या लेगस्पिनर्सनी मुंबईच्या गोलंदाजांना अक्षरश: आपल्या तालावर नाचायला लावले.



दिल्लीच्या लेगस्पिनर्सची कमाल

मुंबई संघ १ बाद ५७ अशा स्थितीत असताना दिल्लीच्या स्पिनर्सनी कमाल केली. लेगस्पिनर अमित मिश्राने इशान किशन (५) आणि लुइस (४८) यांचा अडसर दूर करत दिल्लीला सामन्यात पुनरागमन करून दिले. त्यानंतर लेगस्पिनर संदीप लमिचाने याने किरॉन पोलार्ड (७) आणि कृणाल पंड्या (४) यांना बाद करत मुंबईची अवस्था ५ बाद ७८ अशी केली.


हार्दिक पंड्याची तुफानी फलंदाजी

मुंबईचे फलंदाज एकापाठोपाठ माघारी परतत असताना हार्दिक पंड्या मुंबईसाठी धावून आला. रोहित शर्मा खांदा दुखावला असतानाही मैदानात परतला. या दोघांनी ४३ धावांची भर घालत मुंबईच्या विजयाच्या आशा पल्लवित केल्या. मात्र रोहित (१३) आणि हार्दिक २७) लागोपाठ बाद झाल्याने मुंबईच्या विजयाच्या आशा मावळल्या.


बेन कटिंगने काढले दिल्लीचे घामटे

मुंबई संघ पराभवाच्या छायेत असताना गतविजेत्यांना विजयासाठी ३० चेंडूंत ५३ धावांची आवश्यकता होती आणि मुंबईचे ७ विकेट्स माघारी परतले होते. सर्व आशा बेन कटिंगवर होत्या. बेन कटिंगनेही धुव्वाधार फलंदाजी करत मुंबईला विजयासमीप आणून ठेवले. अखेरच्या षटकांत १८ धावांची गरज असताना कटिंगने पहिल्याच चेंडूवर षटकार ठोकला. मात्र हर्षल पटेलच्या पुढच्या चेंडूवर कटिंगने मारलेला उत्तुंग फटका सीमारेषेजवळ गेला आणि मॅक्सवेलने कोणतीही चूक न करता कटिंगचा झेल पकडला. कटिंगची वादळी खेळी (२० चेंडू, २ चौकार, ३ षटकार) ३७ धावांवर संपुष्टात आली. तिसऱ्या चेंडूवर जसप्रीत बुमराही झेल देऊन माघारी परतल्यामुळे मुंबईचा डाव १९.३ षटकांत १६३ धावांवर संपुष्टात आला आणि दिल्लीने ११ धावांनी विजय साकारला.


दिल्लीची अडखळती सुरुवात

तत्पूर्वी, प्रथम फलंदाजी करणाऱ्या दिल्ली डेअरडेव्हिल्ससाठी प्ले-ऑफ फेरीतील आव्हान याआधीच संपुष्टात आल्याने त्यांच्यासाठी हा जणू सराव सामनाच होता. पण घरच्या मैदानावर खेळणाऱ्या दिल्लीची सुरुवात काहीशी निराशाजनक झाली. हार्दिक पंड्याच्या एका अचूक फेकीवर पृथ्वी शॉने (१२) अक्षरश: आपली विकेट गमावली. पाठोपाठ ग्लेन मॅक्सवेल (२२) याला जसप्रीत बुमराने त्रिफळाचीत केले. कर्णधार श्रेयस अय्यरही (६) चांगली कामगिरी करू शकला नाही.


रिषभ पंत धावून आला

९ षटकांत अवघ्या ७५ धावांवर तीन विकेट्स माघारी परतल्यानंतर रिषभ पंत दिल्लीसाठी धावून आला. रिषभ पंतने विजय शंकरला हाताशी धरत दिल्लीचा डाव सावरला. या दोघांनी चौथ्या विकेटसाठी ६४ धावांची भागीदारी रचली. रिषभने चौफेर फलंदाजी करताना ४४ चेंडूंत ४ चौकार आणि ४ षटकारांसह ६४ धावांची खेळी केली. शंकरनेही ३० चेंडूंत ३ चौकार आणि २ षटकारांची आतषबाजी करत नाबाद ४३ धावा तडकावल्या. त्यामुळे दिल्ली डेअरडेव्हिल्सला २० षटकांत ४ बाद १७४ धावा करता आल्या.

Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा