केपी अॅकेडमी, स्पोर्टिंग क्लब उपांत्यपूर्व फेरीत

 Thane
केपी अॅकेडमी, स्पोर्टिंग क्लब उपांत्यपूर्व फेरीत

ठाण्यातील दादोजी कोंडदेव स्टेडियम येथे सुरु असलेल्या पालकमंत्री चषक 20-20 क्रिकेट स्पर्धेत केपी क्रिकेट अॅकेडमीने गोल्डन स्टार क्रिकेट क्लबवर अवघ्या 3 धावांनी विजय मिळवला. तसेच दुसऱ्या सामन्यात स्पोर्टिंग क्रिकेट क्लबने बॉईज क्रिकेट क्लबचा 7 गडी राखून पराभव केला. या दोन्ही विजयी संघांनी उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला.

डळमळीत सुरुवातीनंतरही रुपेश तिवारी (37 धावा) आणि अबू सिद्दीकी (नाबाद 30 धावा) यांच्या दमदार फलंदाजीच्या जोरावर केपी क्रिकेट अॅकेडमीने 20 षटकांत 8 बाद 141 धावा केल्या. केपी क्रिकेट अॅकेडमीचा डाव सावरताना रुपेश तिवारी व प्रणव धनावडे यांनी चौथ्या विकेटसाठी 33 धावांची, तर अबू सिद्दीकी व गौरव सूर्यवंशीने सातव्या विकेटसाठी 43 धावांची भागीदारी केली.

गोल्डन स्टार संघातील गोलंदाज राहुल कश्यप (4 धावांत 2 बळी), सागर पाटील (26 धावांत 2 बळी) आणि कप्तान विजय इंदप (25 धावांत 2 बळी) यांनी अचूक गोलंदाजी करत केपी क्रिकेट अॅकेडमीच्या फलंदाजावर अंकुश ठेवला.

त्यानंतर 142 धावांचा पाठलाग करण्यासाठी मैदानात उतरलेल्या गोल्डन स्टार क्लबने दमदार सुरूवात केली. सलामीवीर ओमकार रहाटे (41 चेंडूत 41 धावा) व रमेश ठिगळे (20 चेंडूत 31 धावा) यांच्या 55 धावांच्या सलामीनंतर गोल्डन स्टार क्लबची 1 बाद 94 धावा अशी उत्तम स्थिती होती. परंतु केपी क्रिकेट अॅकेडमीचा कप्तान राहुल कदम (19 धावांत 2 बळी), गौरव सूर्यवंशी (25 धावांत 2 बळी) यांनी ठराविक अंतराने महत्वपूर्ण बळी घेत गोल्डन स्टारच्या फलंदाजीला खिंडार पाडले. गोलंदाजांना क्षेत्ररक्षकांनीही तितकीच दमदार साथ दिली. क्षेत्ररक्षकांनी तिघांना धावचीत केल्यामुळे गोल्डन स्टारला केवळ 138 धावांपर्यंत मजल मारता आली.

तर, दुसऱ्या सामन्यात बॉइज क्रिकेट क्लबचा फलंदाज सचिन यादवचा (36 धावा) अपवाद वगळता इतर फलंदाजांनी सपशेल निराशा केली. स्पोर्टिंग क्लबच्या सैफ शेख (10 धावांत 4 बळी), अमरी भोरानिया (17 धावांत 2 बळी), अकबर खान (23 धावांत 2 बळी) यांनी केलेल्या भेदक माऱ्यापुढे बॉइज क्रिकेट क्लबच्या फलंदाजांना खेळपट्टीवर फार काळ टिकाव धरता आला नाही. परिणामी बॉइज क्रिकेट क्लबचा डाव 15.4 षटकांत 85 धावांतच आटोपला. त्यानंतर विशाल जैन (48 धावा) आणि संतोष भोर (29 धावा) यांच्या फलंदाजीच्या जोरावर स्पोर्टिंग क्रिकेट क्लबने अकराव्या षटकांत 3 बाद 91 अशी विजयी धावसंख्या रचली.

Loading Comments