Advertisement

वेस्ट इंडिजविरूद्धची मुंबई वन डे संकटात!

इंदूर आणि कोलकातानंतर २९ आॅक्टोबरला मुंबईत होणारी वन डे मॅच देखील संकटात सापडली आहे. यामागचं कारण म्हणजे 'मुंबई क्रिकेट असोसिएशन'ला जाणवत असलेला पैशांचा तुटवडा.

वेस्ट इंडिजविरूद्धची मुंबई वन डे संकटात!
SHARES

भारत-वेस्ट इंडिज दरम्यान सुरू असलेल्या क्रिकेट सिरिजमधील मॅचच्या आयोजनाचा वाद आता वाढतच चालला आहे. इंदूर आणि कोलकातानंतर २९ आॅक्टोबरला मुंबईत होणारी वन डे मॅच देखील संकटात सापडली आहे. यामागचं कारण म्हणजे 'मुंबई क्रिकेट असोसिएशन'ला जाणवत असलेला पैशांचा तुटवडा. यावर तोडगा काढण्यासाठी 'एमसीए'ने या वन डे चं आयोजन भारतीय क्रिकेट नियामक मंडळा (बीसीसीआय)ने करावं, अशी विनंती केली होती. परंतु ही विनंती बीसीसीआयने फेटाळून लावली आहे.


नामुश्कीची वेळ

माध्यमांमधील वृत्तानुसार 'एमसीए'ला पैशांची चणचण भासत असल्याने विजय हजारे ट्राॅफी दरम्यान 'एमसीए'ला बंगळुरूतील हाॅटेलचं बिलंही भरता आलं नाही. हे बिल भरण्यासाठी त्यांना चक्क बीसीसीआयला साकडं घालावं लागलं.


बीसीसीआयला साकडं

त्यामुळे वानखेडे स्टेडियममध्ये होणाऱ्या मुंबई वन डेचा प्रश्न निकाली काढण्यासाठी 'एमसीए'च्या पदाधिकाऱ्यांनी बीसीसीआयचे सीईओ राहुल जोहरी यांची मंगळवारी भेट घेतली. या भेटीदरम्यान पदाधिकाऱ्यांनी 'एमसीए'ला भेडसावत असलेली पैशांची अडचण समजावून सांगितली. तसंच मुंबईतील वन डे चं आयोजन 'एमसीए' ऐवजी बीसीसीआयने करावं, अशी विनंती देखील केली. परंतु ही विनंती बीसीसीआयने फेटाळून लावली आहे.


पैशांची अडचण का?

मुंबई उच्च न्यायालयाने बीसीसीआयवर प्रशासक म्हणून नियुक्त केलेल्या न्या. व्ही. एम. कानडे आणि हेमंत गोखले यांचा कार्यकाळ १५ सप्टेंबर रोजी संपला. हा कार्यकाळ वाढवण्यात न आल्याने 'एमसीए'च्या खात्यातून पैसे काढण्यासाठी स्वाक्षरी करणारी एकही अधिकृत व्यक्ती 'एमसीए'कडे उपलब्ध नाही.


प्रक्रिया ठप्प

परिणामी बिल मंजूर करणे, व्हेंडर्सची नियुक्ती करणे, मॅचचं आयोजन करणे ही सर्व प्रक्रिया ठप्प झाली आहे. अशा परिस्थितीत आंतरराष्ट्रीय क्रिकेट मॅच आयोजित करणे 'एमसीए'ला सद्यस्थितीत तरी शक्य नाही.


वादाचं ग्रहण

याअगोदर काॅम्पलिमेंट्री तिकीटांच्या वादातून मध्य प्रदेश क्रिकेट असोसिएशनने इंदूर वन डे मॅच आयोजित करण्यास नकार दिला होता. त्यामुळे २४ नोव्हेंबरला होणारी वन डे आता विशाखापट्टणमला होणार आहे. तर कोलकाता इथं होणाऱ्या टी २० मॅचच्या तिकीट वाटपावर क्रिकेट असोसिएशन आॅफ बंगालचे अध्यक्ष सौरव गांगुलीने नाराजी दर्शवली होती.


मॅच किती, कुठे?

वेस्ट इंडिज क्रिकेट टीम सध्या भारतीय दौऱ्यावर आली असून हे दोन्ही संघ २ टेस्ट मॅचसोबतच ५ वन डे आणि ३ टेस्ट मॅचमध्ये आमनेसामने येणार आहे. यातील पहिली वन डे मॅच २१ आॅक्टोबरला गुवाहाटी, दुसरी २४ आॅक्टोबरला विशाखापट्टणम, तिसरी २७ आॅक्टोबरला पुणे, चौथी २९ आॅक्टोबरला मुंबई आणि पाचवी १ नोव्हेंबरला तिरूवनंतपुरम इथं होणार आहे. तर ४ नोव्हेंबरला कोलकाता, ६ नोव्हेंबरला लखनऊ आणि ११ नोव्हेंबरला चेन्नईत टी २० मॅच होणार आहे.



हेही वाचा-

विजय हजारे ट्राॅफी: क्वार्टर फायनलसाठी रोहित शर्माचं सिलेक्शन

विराट म्हणतो, मला पत्नीसोबत राहू द्या!



Read this story in English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा