Advertisement

प्रशिक्षक पोवार यांनी अपमानास्पद वागणूक दिली, मितालीचा खळबळजनक आरोप

वेस्ट इंडिजला पोहोचल्यावर माझ्या आणि पोवार यांच्यामध्ये भांडण झालं होतं. त्यावेळी त्यांनी मला अपमानित केलं. त्यांनी आणि प्रशासकीय समिती सदस्या डायना एडल्जी यांनी आपल्या पदाचा गैरवापर करत मला संघाबाहेर काढलं, असं म्हणत मितालीने दोघांवर गंभीर आरोप केले आहेत.

प्रशिक्षक पोवार यांनी अपमानास्पद वागणूक दिली, मितालीचा खळबळजनक आरोप
SHARES

भारतीय महिला क्रिकेट संघाचे प्रशिक्षक रमेश पोवार आणि प्रशासकीय समिती सदस्या डायना एडल्जी यांनी पदाचा गैरवापर करत मला अत्यंत अपमानजनक वागणूक दिली. यामुळे माझ्या करियरमध्ये मला पहिल्यांदाच नैराश्य आल्याचा खळबळजनक आरोप माजी कर्णधार मिताली राज हिने केला आहे. बीसीसीआयचे मुख्य प्रशासकीय अधिकारी राहुल जोहरी आणि क्रिकेट ऑपरेशन्स पाहणारे माजी क्रिकेटपटू साबा करीम यांना एक पत्र लिहित मितालीने आपल्या मनातील खदखद व्यक्त केली आहे.


वादाचं कारण काय?

वेस्ट इंडिजमधील महिला टी २० विश्वचषक स्पर्धेत भारताला उपांत्य फेरीत इंग्लंडकडून पराभव पत्करावा लागला. या सामन्यात अनुभवी मितालीला वगळण्यात आलं होतं. यावरून मोठा वादंग माजला होता. पाकिस्तान आणि आर्यलंडविरूद्धच्या सामन्यात मितालीने लागोपाठ २ अर्धशतके झळकावली. परंतु दुखापतीमुळे तिला आॅस्ट्रेलियाविरुद्धच्या सामन्याला मुकावं लागलं.


मितालीच्या व्यवस्थापकाची टीका

त्यामुळे उप उपांत्य फेरीत आॅस्ट्रेलियाला हरवणारा भारतीय संघ इंग्लडविरुद्धच्या सामन्यासाठी कायम ठेवण्याचा निर्णय कर्णधार हरमनप्रीतने घेतला होता. पण हा सामना हरल्यानंतर टीकाकारांची चोहोबाजूने टीका होऊ लागली. त्यानंतर हरमनप्रीत आणि डायना एडल्जी यांनी आपल्या निर्णयाचं समर्थन केलं. मात्र मितालीला वगळल्यामुळेच भारताचा पराभव झाला आणि याला हरमनप्रीत कारणीभूत आहे, असं ट्विट मितालीची व्यवस्थापक अनिषा गुप्ताने केल्यानंतर या वादात तेल ओतलं गेलं.

वारंवार अपमान

त्यानंतर पहिल्यांदाच मितालीने याप्रकरणी उघडपणे मत व्यक्त केलं आहे. आपल्या पत्रात मिताली म्हणाली की, वेस्ट इंडिजला पोहोचल्यावर माझ्या आणि पोवार यांच्यामध्ये भांडण झालं होतं. त्यावेळी त्यांनी मला अपमानित केलं. त्यांनी आणि प्रशासकीय समिती सदस्या डायना एडल्जी यांनी आपल्या पदाचा गैरवापर करत मला संघाबाहेर काढलं.


पोवार पाठ फिरवायचे

मी नेटमध्ये प्रॅक्टिस करत असताना पोवार तिथून निघून जायचे. मी त्यांच्याशी बोलायला गेले, तर ते फोनमध्ये बिझी व्हायचे किंवा पाठ फिरवायचे. हे माझ्यासाठी खूपच अपमानास्पद होतं. मी प्रसारमाध्यमांशी चर्चा करू नये किंवा ड्रेसिंग रूममधून बाहेर पडू नये म्हणून मला नजरकैदेत ठेवण्यात आलं होतं. मला एडल्जीबद्दल आदर आहे. पण त्या माझ्याविरोधात त्यांच्या पदाचा वापर करतील, असा विचार मी कधीच केला नव्हता.

पहिल्यांदाच नैराश्य

माझ्या २० वर्षांच्या करियरमध्ये पहिल्यांदाच माझा आत्मविश्वास खचला, मला नैराश्य आलं. मी केलेल्या देशाच्या सेवेला खरंच इतकीही किंमत नव्हती का की काहीजण सत्तेचा वापर करून मला उद्ध्वस्त करायला निघाले आहेत, असा विचार करायला मला त्यांनी भाग पाडलं.


हरमनप्रीतने मन दुखावलं

हरमनप्रीतच्या विरोधात मला काही बोलायचं नाही. पण मला संघाबाहेर काढण्याच्या प्रशिक्षकांच्या निर्णयाला तिने दिलेला पाठिंबा मला फारच दुखावणारा होता. मला माझ्या देशासाठी वर्ल्ड कप जिंकायचा होता. आपण ही सुवर्णसंधी गमावली, याचे मला खूप वाईट वाटतं.



हेही वाचा-

भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया टी-२० : भारताचा दणदणीत विजय

तळवलकर क्लासिक शरीरसौष्ठव स्पर्धा २८ नोव्हेंबरला, सुनीत जाधव करणार राज्याचं प्रतिनिधित्व



Read this story in English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा