Advertisement

IPL 2020 : मुंबई इंडियन्सविरोधात अखेर सुपर ओव्हरमध्ये बंगळुरूनं मारली बाजी


IPL 2020 : मुंबई इंडियन्सविरोधात अखेर सुपर ओव्हरमध्ये बंगळुरूनं मारली बाजी
SHARES

आयपीएलच्या १३ व्या हंगामातील रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु विरुद्ध मुंबई इंडियन्स यांच्यात झालेल्या सामन्यात विराटच्या 'अरसीबी'चा विजय झाला आहे. दुबईच्या मैदानावर रंगलेला हा सामना सुपरओव्हरपर्यंत गेला व अखेर मुंबईवर विराटच्या रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुनं मात केली. मुंबईने सुपरओव्हरमध्ये पहिल्यांदा फलंदाजी करताना फक्त ७ धावा केल्या. नवदीप सैनीने सुपरओव्हर टाकताना टिच्चून मारा करत मुंबईच्या फलंदाजांना मोठे फटके खेळण्याची संधी दिली नाही. मात्र, मुंबईकडून गोलंदाजीसाठी आलेल्या जसप्रीत बुमराहने सुपरओव्हर भन्नाट मारा केला. परंतू शेवटच्या चेंडूवर विजयासाठी एका धावेची गरज असताना विराटने चौकार लगावत संघाच्या विजयावर शिक्कामोर्तब केलं.

नाणेफेक जिंकून मुंबईने प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. त्यामुळं सलामीवीर फिंच, पडीकल यांची अर्धशतकं आणि मुंबईच्या गोलंदाजांचा समाचार घेत डिव्हीलियर्सनेही नाबाद ५५ धावांची खेळी केली. तसंच एबी डिव्हीलियर्सच्या या फटकेबाजीच्या जोरावर बंगळुरूनं मुंबईविरोधात २०१ धावांचा टप्पा गाठला. फिंचनं ३५ चेंडूत ५२ धावा काढून माघारी परतला. आपल्या अर्धशतकी खेळीत त्याने ७ चौकार आणि १ षटकार लगावला.

२०१ धावांचा पाठलाग करत असताना मुंबईचा कर्णधार रोहित शर्मा लवकर माघारी परतला. त्यापाठोपाठ सुर्यकुमार यादव व क्विंटन डिकॉकही माघारी परतले. परंतु, त्यानंतर फलंदाजीसाठी आलेल्या इशान किशन आणि कायरन पोलार्ड यांनी संघाचा डाव सावरला. या दोन्ही खेळाडूंनी केलेल्या फटकेबाजीच्या जोरावर मुंबई इंडियन्सनं बंगळुरूच्या विरुद्धचा सामना बरोबरीत सोडवण्यात यश मिळवलं. विजयासाठी एका चेंडूत ५ धावांची गरज असताना कायरन पोलार्डने चौकार लगावत सामना बरोबरीत सोडवला. इशान किशननं ५८ चेंडूत २ चौकार आणि ९ षटकारांसह ९९ धावा केल्या. अवघ्या एका धावानं त्याचं शतक हुकलं. पोलार्डनं ६० धावा करत त्याला चांगली साथ दिली.

या सामन्यात मुंबईचे गोलंदाज यशस्वी ठरले. राहुल चहरच्या गोलंदाजीवर विराट कोहली अवघ्या ३ धावांवर माघारी परतला. मुंबईकडून ट्रेंट बोल्टने २ तर राहुल चहरनं १ बळी घेतला. यानंतर मैदानात आलेल्या एबी डिव्हीलियर्सने देवदत पडीकलसोबत फटकेबाजी करुन संघाला आश्वासक धावसंख्येचा टप्पा गाठून दिला. पडीकलनेही एक बाजू लावून धरत आपलं अर्धशतक झळकावलं. त्याने ५४ धावांची खेळी केली. यानंतर डिव्हीलियर्स आणि शिवम दुबे यांनी पुन्हा एकदा मुंबईच्या गोलंदाजांचा समाचार घेत बंगळुरूला सामन्यात दमदार पुनरागमन करुन दिली.

संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा