Advertisement

बद्रे अालमच्या दमदार गोलंदाजीमुळे पय्याडे अंतिम फेरीत


बद्रे अालमच्या दमदार गोलंदाजीमुळे पय्याडे अंतिम फेरीत
SHARES

मध्यमगती गोलंदाज बद्रे अालमच्या शानदार कामगिरीमुळे (२१ धावांत ६ विकेट्स) पय्याडे क्रिकेट क्लबने उपांत्य फेरीत यंग मोहमदेन क्लबचा ६ विकेट्सनी पराभव करत ६९व्या नवाब सालार जंग निमंत्रित टी-२० क्रिकेट स्पर्धेची अंतिम फेरी गाठली. मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या (एमसीए) मान्यतेने इस्लाम जिमखान्यावर रंगलेल्या या उपांत्य फेरीच्या सामन्यात पय्याडेने यंग मोहमदेनचे ९५ धावांचे अाव्हान चार विकेट्सच्या मोबदल्यात सहज पार केले.


यंग मोहमदेनची फलंदाजी निष्प्रभ

प्रथम फलंदाजी करताना यंग मोहमदेनची अाघाडीची फळी अालमच्या वेगवान माऱ्यासमोर अक्षरश: गडगडली. त्यामुळे त्यांचा डाव १३.३ षटकांत ९३ धावांवर संपुष्टात अाला. सातव्या क्रमांकावरील संदेश कोळीने सर्वाधिक नाबाद २० धावांची खेळी केली.


प्रफुल्ल वाघेलाची चमक

प्रफुल्ल वाघेलाने चमकदार फलंदाजी करत पय्याडेची एक बाजू लावून धरली. त्याने २६ चेंडूंत ८ चौकारांसह नाबाद ४७ धावा फटकावल्या. त्यामुळे पय्याडेने १२.१ षटकांत सहजपणे ९५ धावांचे लक्ष्य गाठले. मुसावीर खोटेने २० धावा करत त्याला चांगली साथ दिली. अाता अंतिम फेरीत पय्याडेची गाठ पारसी जिमखान्याशी पडेल.


हेही वाचा -

मुंबई इंडियन्स संघात अॅडम मिलनेची एंट्री

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा