मुंबई स्पोर्टिंग युनियनचा सनसनाटी विजय

  Churchgate
  मुंबई स्पोर्टिंग युनियनचा सनसनाटी विजय
  मुंबई  -  

  चर्चगेटच्या ओव्हल मैदानावर झालेल्या 16 वर्षांखालील 'संतोष कुमार घोष ट्रॉफी' क्रिकेट स्पर्धेत मंगळवारी मुशीर खान याने अष्टपैलू खेळ करत सर्वांचे लक्ष वेधून घेतले. या सामन्यात मुंबई स्पोर्टिंगने मुलुंड जिमखाना संघावर सनसनाटी विजय मिळवला.

  प्रथम फलंदाजीस उतरलेल्या मुलुंड जिमखाना संघाला मुंबई स्पोर्टिंग युनियनने अवघ्या 142 धावांमध्ये गुंडाळले. यात मुशीर खानने बहुमोलाचे योगदाने दिले. मुशीरने उत्तम फिरकी गोलंदाजी करत एका हॅट्रिकसह 34 धावांत 4 बळी टिपले. मुशीरला विराज पवार (44/3) आणि ऋतिक चौधरी (23/2) यांची मोलाची साथ मिळाली. मुलुंड जिमखानातर्फे तेजस देशमुख याने सर्वाधिक 29 धावा केल्या. या तुटपुंज्या लक्ष्याचा पाठलाग करताना मुंबई स्पाेर्टींगचीही चांगलीच घसरगुंडी उडाली होती. मुलुंड जिमखानाच्या
  तेजस देशमुख (45/4) आणि डावखुरा फिरकी गोलंदाज मुकेश यादव (26/3) यांनी मुंबई स्पोर्टिंगला चांगलाच घाम फोडला होता. पण मुशीर खान याने नाबाद 92 धावांची खेळी करून संघाला एकहाती विजय मिळवून दिला. त्यांच्या अन्य फलंदाजांना दोन आकडी धावाही करता आल्या नाहीत.

  आजच्या अन्य लढतींमध्ये सुवर्णलता आचरेकर इलेव्हन संघाने सुधांशू स्पोर्ट्स संघाला 108 धावांत गुंडाळले आणि देव मनसुखानी याच्या 45 धावांच्या खेळीमुळे विजयी लक्ष्य केवळ 3 गडी गमावत पूर्ण केले. न्यू इरा येथील लढतीत विक्रोळीयन्स स्पोर्ट्स क्लब संघाने जुही स्पोर्ट्स क्लबला 131 धावत गुंडाळले. मात्र ध्रुव पोद्दार याने केवळ 11 धावांत 4 बळी मिळवत विक्रोळीयन्स संघाला 68 धावांतच गुंडाळले. शशी शेट्टी याच्या 70 धावांमुळे एम.आय.जी.ने वर्ल्ड स्पोर्ट्स विरुद्ध 164 धावा केल्या. या आव्हानाचा पाठलाग करताना वर्ल्ड स्पोर्ट्स संघाचा डाव 124 धावांत आटोपला. अथर्व डाकवे याने 26 धावांत 3 बळी मिळवले.

  Loading Comments

  संबंधित बातम्या

  © 2018 MumbaiLive. All Rights Reserved.