Advertisement

अभिनव सिंगची शतकी खेळी, न्यू ईरा संघाला विजेतेपद


अभिनव सिंगची शतकी खेळी, न्यू ईरा संघाला विजेतेपद
SHARES

सलामीवीर अभिनव सिंगच्या शतकी खेळीमुळे न्यू ईरा संघाने ७व्या संतोषकुमार घोष ट्रॉफी या १६ वर्षांखालील मुलांच्या क्रिकेट स्पर्धेत विजेतेपदाचा मान पटकावला. आयुष जेठवा याची स्पर्धेतील सर्वोत्तम खेळाडू म्हणून निवड करण्यात आली तर अभिनव सिंग याला सर्वोत्तम फलंदाज आणि अमान मणिहार याला सर्वोत्तम गोलंदाज म्हणून गौरविण्यात आले. मुंबईचे माजी महान रणजीपटू पद्माकर शिवलकर यांच्या हस्ते विजेत्यांना गौरविण्यात आले.


न्यू ईराची अडखळती सुरुवात

स्पोर्टिंग युनियन क्लबतर्फे अायोजित या स्पर्धेत केआरपी इलेव्हन संघाच्या १८१ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना न्यू ईरा संघाची सुरुवात अडखळत झाली होती. केवळ २९ धावांत त्यांचे तीन फलंदाज तंबूत परतले होते. अथर्व भोसलेच्या डावखुऱ्या फिरकी गोलंदाजीने ही करामत केली होती.


अभिनव-श्रेयसची शतकी भागी

कालच्या ३ बाद ४६ वरून पुढे खेळताना धावसंख्येत १९ धावांची भर पडल्यानंतर साद शेख तंबूत परतला आणि के.आर.पी. संघाच्या गोटात चैतन्य पसरले. मात्र अभिनव सिंग अाणि श्रेयस मांडलिक यांनी प्रतिस्पर्धी संघाच्या गोलंदाजीतली हवाच काढून टाकली. या जोडीने पाचव्या विकेटसाठी १६५ धावांची भागीदारी करून पहिल्या डावातील महत्वपूर्ण आघाडी मिळवून देत संघाचा विजय निश्चित केला.


अभिनवचे दमदार शतक

अभिनवने आपल्या शतकी खेळीत १५ चौकार ठोकत १०९ धावा फटकावल्या. श्रेयसने १३ चौकारांसह ८४ धावा केल्या. न्यू ईरा संघाने ९० षटकांत ८ बाद २७५ धावा करून आपला डाव घोषित केला. काल तीन बळी मिळवत अपेक्षा उंचावणाऱ्या अथर्व भोसलेला आज एकही बळी मिळविता आला नाही तर दुसरा डावखुरा फिरकी गोलंदाज सुमित जोशी याने ४२ धावांत २ बळी मिळविले. दुसऱ्या डावात के.आर.पी. इलेव्हनने १७ षटकात ३ बाद ९६ धावा केल्या, ज्यात आयुष जेठवाचा वाटा होता नाबाद ६० धावांचा.

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा