Advertisement

पय्याडे स्पोर्टस क्लब, डी. वाय. पाटील उपांत्य फेरीत


पय्याडे स्पोर्टस क्लब, डी. वाय. पाटील उपांत्य फेरीत
SHARES

शतकवीर अमन खानच्या १०३ धावांच्या झंझावाती फलंदाजीमुळे डॉ. डी.वाय पाटील स्पोर्टस अकादमीने गतविजेत्या नॅशनल स्पोर्टस क्लबचे आव्हान उपांत्यपूर्व फेरीतच २९ धावांनी संपुष्टात आणले आणि विजय मांजरेकर व रमाकांत देसाई स्मृती चषक टी-२० क्रिकेट स्पर्धेत दुसऱ्या दिवशी खळबळजनक विजयाची नोंद करत उपांत्य फेरी गाठली. शिवाजी पार्क जिमखान्यातर्फे अायोजित या स्पर्धेतील दुसऱ्या उपांत्यपूर्व सामन्यात पय्याडे क्रिकेट क्लबने केव्हिन अल्मेडा (४१ धावा) व धृमिल मटकर (३ बळी) यांच्या सुरेख कामगिरीमुळे सिंद स्पोर्टस क्लबवर १४ धावांनी विजय मिळवित उपांत्य फेरीतील स्थान निश्चित केले.


अमन-शशांकची शतकी भागीदारी

सलामीवीर शशांक सिंग (४६ धावा) व शतकवीर अमन खान यांनी दुसऱ्या विकेटसाठी १३९ धावांची भागीदारी रचत डॉ. डी. वाय. पाटील स्पोर्टस अकादमीला चांगली सुरुवात करून दिली. परिणामी डी. वाय. पाटील स्पोर्ट्स अकॅडमीने २० षटकात ७ बाद २०३ धावांचा डोंगर रचला. हे लक्ष्य गाठताना नॅशनल स्पोर्टस क्लबची सलामी जोडी ११ धावांवर फुटली. सुमित घाडीगावकर (५० धावा) व ओंकार गुरव (४५ धावा) दुसऱ्या विकेटसाठी ९७ धावांची भागीदारी करून दिली. परंतु त्यानंतर अरुण यादव (२ बळी), प्रवीण तांबे (१ बळी) यांनी प्रभावी गोलंदाजी करून नॅशनल स्पोर्ट्स क्लबला मर्यादित २० षटकात ७ बाद १७४ धावांवर रोखले.


ध्रूमिल मटकरची सुरेख गोलंदाजी

पय्याडे क्रिकेट क्लबने केव्हिन अल्मेडा (४१ धावा), जिनिव जोशी (२९ धावा), पराग खानापूरकर (३० धावा) व संदीप कुंचीकोर (२३ धावा) यांच्या दमदार फलंदाजीमुळे २० षटकांत सर्वबाद १६४ धावांची मजल गाठली. सिंद क्लबकडून वैभव सिंगने २२ धावांत ४ बळी तर शहीद खानने २ विकेट्स मिळवल्या. या अाव्हानाचा पाठलाग करताना सिंद स्पोर्ट्स क्लबचा तिसऱ्या क्रमांकावरील कुशल शाहचा ( ६६ चेंडूत ८६ धावा) अपवाद वगळता अन्य फलंदाज फार वेळ खेळपट्टीवर टिकू शकले नाहीत. परिणामी सिंद स्पोर्ट्स क्लबला ९ बाद १५० धावांवर रोखून पय्याडे क्रिकेट क्लबने १४ धावांनी विजय मिळवीत उपांत्य फेरी गाठली. पय्याडेच्या धृमिल मटकरने ३ बळी टिपत विजयात मोलाची कामगिरी बजावली.


हेही वाचा -

शिवाजी पार्क जिमखाना टी-२० स्पर्धा २२ मार्चपासून

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा