Advertisement

'संतोषकुमार घोष स्पर्धे'तील उपांत्य फेरीतले संघ निश्चित


'संतोषकुमार घोष स्पर्धे'तील उपांत्य फेरीतले संघ निश्चित
SHARES

'स्पोर्टिंग युनियन क्लब' आयोजित 6 व्या संतोषकुमार घोष 16 वर्षांखालील क्रिकेट स्पर्धेत शुक्रवारी झालेल्या सामन्यांत मुंबई स्पोर्टिंग युनियन क्लब, रेखा स्पोर्ट्स अॅण्ड मीडिया, एम.आय.जी. तसेच मारिया स्पोर्ट्स क्लब यांनी उपांत्य फेरीत धडक मारली आहे.

उपांत्यपूर्व फेरीच्या लढतीत मुंबई स्पोर्टिंग युनियन संघाने सुवर्णलता आचरेकर संघावर 6 विकेट्सने विजय मिळविला. तर रेखा स्पोर्ट्स आणि मीडिया संघाने भोसले क्रिकेट अकादमीवर 8 विकेट्सनी विजय मिळवला. अन्य लढतींमध्ये एम.आय.जी. संघाने जुही स्पोर्ट्स क्लब संघावर 147 धावांनी विजय मिळवला असून मारिया स्पोर्ट्स क्लबने चनावला स्पोर्टस् संघाला 79 धावांनी हरवून उपांत्य फेरीत प्रवेश केला.

मुंबई स्पोर्टिंग युनियन संघाने सुवर्णलता आचरेकर संघाचा 71 धावांत धुरळा उडवला. या सामन्यात शोएब शेख, असीम शेख आणि मुशीर खान यांनी प्रत्येकी दोन बळी घेतले. या तुटपुंज्या धावसंख्येचा पाठलाग करताना यामीन सोरटिया 21 आणि विजय सिंग 31 यांनी संघाचा विजय निश्चित केला.

पारसी सायक्लिस्ट येथील लढतीत रेखा स्पोर्ट्स आणि मीडिया संघाने प्रथम फलंदाजी करणाऱ्या भोसले क्रिकेट अकादमी संघाला 114 धावांत गुंडाळले. डावखुरा फिरकी गोलंदाज करण भानुशाली याने 24 धावांत 3 बळी मिळवले. नंतर अमित शर्मा (नाबाद 47 धावा) आणि अभिषेक वालिया (41 धावा) यांनी दुसऱ्या विकेटसाठी 75 धावांची भागीदारी रचून संघाला उपांत्य फेरीत नेले.

एम. आय. जी. संघाने जुही स्पोर्ट्स विरुद्ध 45 षटकांत 8 बाद 210 धावा फटकावल्या. यात निहार आग्रे याने 57 आणि अमृत हरीन्द्रन याने 62 धावा केल्या. या आव्हानासमोर जुही स्पोर्ट्स क्लब संघ 63 धावांतच गारद झाला. सौद मन्सुरी, शाश्वत जगताप आणि असद शेख यांनी प्रत्येकी दोन बळी मिळवत संघाचा विजय निश्चित केला.

मारिया स्पोर्ट्स क्लबने मनीष यादव (92 धावा) आणि विराज धामापूरकर यांच्या चौथ्या विकेटसाठी केलेल्या 109 धावांच्या भागीदारीच्या जोरावर 228 धावांचे लक्ष्य उभारले आणि अनुज भोर याच्या डावखुऱ्या फिरकीच्या जोरावर (3 धावांत 3 बळी) चनावाला स्पोर्ट्स संघाला 149 धावांत गुंडाळले.

Read this story in English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा