Advertisement

संघ निवडीची समिक्षा व्हायलाच हवी!

सेमी फायनलमध्ये न्यूझीलंडकडून हार पत्करावी लागल्याने टीम इंडियाला क्रिकेट वर्ल्डकपमधून गाशा गुंडाळावा लागला. ही बाब अजूनही टीम इंडियाचे चाहते आणि क्रिकेट समिक्षकांच्या पचनी पडलेली नाहीय.

संघ निवडीची समिक्षा व्हायलाच हवी!
SHARES

सेमी फायनलमध्ये न्यूझीलंडकडून हार पत्करावी लागल्याने टीम इंडियाला क्रिकेट वर्ल्डकपमधून गाशा गुंडाळावा लागला. ही बाब अजूनही टीम इंडियाचे चाहते आणि क्रिकेट समिक्षकांच्या पचनी पडलेली नाहीय. त्यामुळेच या पराभवाला नेमकं जबाबदार कोण? यावरून देशपातळीवर चर्चा सुरू झालीय. या चर्चांमध्ये हमखास उपस्थित होणारा मुद्दा म्हणजे मिडल आॅर्डरमधील फलंदाजांना आव्हान पेलण्यात आलेलं अपयश आणि निवड समितीने केलेली चुकीची संघनिवड. यावरून निवड समितीवर सडकून टीका होतेय. ही टीका होणंही स्वाभाविकच आहे म्हणा. दर ४ वर्षांनी येणाऱ्या वर्ल्डकपसाठी संघबांधणी करण्याकरीता निवड समितीला पुरेसा वेळ मिळाला होता. मागच्या २ ते ३ वर्षांमध्ये निवड समितीने टाॅप आॅर्डर, मिडल आॅर्डर आणि बाॅलिंग डिपार्डमेंटमध्ये असंख्य एक्सपिरिमेंट केले. अनेक खेळाडूंना आजमावून बघितलं. यातून जेव्हा वर्ल्ड कपसाठी संघ निवडण्याची वेळ आली, तेव्हाच नेमकी निवड समितीने माती खाल्ली. सगळ्यात पहिल्यांदा आपण टाॅप आॅर्डरच्या बॅटींग लाइनअपवर नजर टाकूया. निवड समितीने पहिल्या ३ क्रमांकासाठी शिखर धवन, राेहीत शर्मा आणि विराट कोहली या बॅट्समन्सची निवड केली. या नावांच्या विश्वासार्हतेवर कुणाचंही दुमत असण्याचं कारण नव्हतं. पण यापैकी एखादा खेळाडू दुखापतग्रस्त झाला, तर त्याला रिप्लेसमेंट कोण? याचा निवड समितीने गांभीर्याने विचारच केला नाही. नेमकं घडलंही तसंच शिखर धवन ग्रुप स्टेजमधील तिसऱ्याच मॅचमध्ये दुखापतग्रस्त झाला आणि इथंच समितीच्या गाफिलपणाचा फटका टीम इंडियाला बसला.शिखरच्या जागी निवड समितीने स्पेशलिस्ट ओपनरला टीममध्ये जागा देणं अपेक्षित होतं. पण तसं न करता निवड समितीने मिडल आॅर्डर बॅट्समन आणि तिसरा विकेट किपर ऋषभ पंतला इंग्लंडला बोलवून घेतलं. ऋषभ पंत टीममध्ये सामील झाल्यावर त्याला चौथ्या क्रमाकांची जागा उपलब्ध करून देण्यात आली. तर चौथ्या क्रमांकावर खेळणाऱ्या के. एल. राहुलला स्ट्रगल करत असतानाही ओपनिंगला पाठवण्यात आलं. संपूर्ण वर्ल्डकपमध्ये राहुलने चिवट बॅटींग करत रोहीतला चांगली साथ दिली. मात्र त्याच्या बॅटींगमध्ये शेवटपर्यंत म्हणावा तसा काॅन्फिडन्स दिसला नाही.वर्ल्डकप होईपर्यंत धवनची रिकव्हरी अशक्य असल्याचं जेव्हा संघ व्यवस्थापनाच्या लक्षात आलं तेव्हाच खरं तर मयांक अग्रवाल पर्यायी ओपनर म्हणून टीममध्ये दाखल व्हायला पाहिजे होता. पण संघ व्यवस्थापनाने त्याला बोलवलं खरं, मात्र शेवटपर्यंत बेंचवरच बसवून ठेवलं.आता येऊया मिडल आॅर्डरकडे. विराटपाठोपाठ क्रिजवर येणाऱ्या चौथ्या क्रमांकाच्या बॅट्समनसाठी निवड समितीने मागील दोन-तीन वर्षांत बरेच एक्सपिरिमेंट केले. या जागेवर सिक्सर किंग युवराज सिंगने एकेकाळी आपला दबदबा तयार केला होता. पण खराब फाॅर्ममुळे तो टीमबाहेर फेकला गेल्यावर या जागी अजिंक्य रहाणेला संधी देण्यात आली. परंतु तोही सातत्य दाखवण्यात अपयशी ठरला. त्यानंतर अंबाती रायडू, के. एल. राहुल, दिनेश कार्तिक, केदार जाधव, विजय शंकर, ऋषभ पंत यांना निवड समितीने वेळोवेळी आजमावून बघितलं. यापैकी संघ व्यवस्थापनाने सर्वात आधी विजय शंकरला चौथ्या क्रमांकावर पाठवून बघितलं. परंतु संधी मिळालेल्या चारपैकी एकाही मॅचमध्ये (१४, २९, १५- २/२२, २-०/४६) त्याला आपली छाप पाडता आली नाही. आता प्रश्न असा उपस्थित होतो की टीममध्ये हार्दिक पंड्याच्या रुपात एक आॅलराऊंडर आधीच उपस्थित असताना शंकरसारख्या दुसऱ्या आॅल राऊंडरला टीममध्ये घेण्याची गरजच काय होती? त्यातही शंकर दुखापतग्रस्त झाल्यावर त्याच्या जागी राखीव खेळाडूंमध्ये नाव असलेल्या रायडुला संघात जागा मिळणं अपेक्षित होतं. पण त्याऐवजी निवड समितीने चक्क मयांक अग्रवालला वर्ल्डकपचं तिकीट पाठवलं आणि अखेरपर्यंत त्याला खेळण्याची संधीच दिली नाही. वर्ल्डकप ही काही एक्सपिरिमेंट करायची जागा नाही, हे निवड समिती आणि संघ व्यवस्थापनाला कळायला हवं होतं. शंकरच्या जागी संघ व्यवस्थापनाने ऋषभ पंतला आणून बसवलं खरं, पण तसं करत असताना अनुभवी दिनेश कार्तिकवर अन्याय देखील केला. त्याला सुरूवातीपासून खेळवायला हवं होतं. पण कार्तिक मोजून तीन मॅच (८,-,६) खेळला. त्यापैकी एका मॅचमध्ये तर त्याला खेळण्याचीही संधी मिळाली नाही. त्याला ग्रुप स्टेजमधील निम्म्या मॅच जरी खेळायला मिळाल्या असत्या, तरी त्याच्या बॅटींगमध्ये काॅन्फिडन्स दिसला असता. ऋषभ पंतला अखेरच्या क्षणी (३२, ४८, ४, ३२) टीममध्ये घ्यायचंच होतं तर निवड समितीने त्याला वर्ल्डकपआधी खेळण्याची पुरेशी संधी का उपलब्ध करून दिली नाही? हा प्रश्नही या निमित्ताने उपस्थित होतो. सोबत महेंद्रसिंग धोनी वगळता हार्दिक पंड्या (२१, १५-०/३१, ४८-०/६८, २६-२/४४, ७-२/५१, ४६-१/२८, ४५-०/६०, ७-१/५०, ३२-१/५५) , केदार जाधव (०-०/१४, ९, ५२, ७-०/४, १२) यांनाही मोठी खेळी करून दाखवता आली नाही. टीम इंडियाने ग्रुप स्टेजमध्ये ज्या मॅच जिंकल्या त्यात टाॅप आॅर्डरने केलेल्या परफाॅर्मन्सचा मोठा वाटा होता. त्यामुळे मिडल आॅर्डरवर म्हणावा तसा दबाव आलाच नाही. पण जेव्हा जेव्हा मिडल आॅर्डरवर परफाॅर्मन्स करून दाखवायची वेळ आली (इंग्लंड, न्यूझीलंड) तेव्हा मिडल आॅर्डरने सपशेल नांगी टाकली. 

राहता राहिला प्रश्न बाॅलर्सच्या परफाॅर्मन्सचा, तर ते आपल्या आघाडीवर एकदम खरे उतरले. भुवनेश्वर कुमार, जसप्रीत बुमराह, मोहम्मद शमी, यजुवेंद्र चहल आणि कुलदीप यादव यांनी मिळालेल्या संधीचा पुरेपुर फायदा उचलला. संधी मिळाली नाही, ती रविंद्र जाडेजाला. जडेजाला अखेरच्या क्षणी संधी मिळूनही त्याने आपल्यातील धमक दाखवून दिली. आॅल राऊंडर म्हणून विजय शंकर ऐवजी जाडेजाला संधी मिळाली असती, तरी त्याने चोख परफाॅर्मन्स दिला असता. 

असो. आता वेळ आलीय ती चुकांतून धडा घेण्याची. बीसीसीआयवर सुप्रीम कोर्टाने नियुक्त केलेली प्रशासक समिती टीम इंडियाच्या पराभवाची समीक्षा करणार असल्याचं कळतंय. या समिक्षा बैठकीत शास्त्री, कोहली आणि एमएसके प्रसाद यांना काही प्रश्नांना सामोरं जावं लागणार आहे. यामध्ये अंबाती रायुडूचं नाव चौथ्या क्रमांकाच्या फलंदाजासाठी यादीत अग्रक्रमावर असताना त्याला का डावलण्यात आल?. टीम इंडियात ३ विकेट किपरची निवड का करण्यात आली? आणि उपांत्य फेरीत धोनीला सातव्या क्रमांकावर फलंदाजीसाठी का पाठवण्यात आलं? यांसारखे प्रश्न प्रशासक समिती उपस्थित करण्याची शक्यता आहे.

या सर्व प्रश्नांची उत्तर देण्याची वेळ आता निवड समितीवर आली आहे आणि समितीने ही उत्तरं द्यायलाच हवी. 



हेही वाचा-

धोनी निवृत्तीचा विचारही मनात आणू नकोस - लतादीदी


Disclaimer: All views expressed in this article are personal and purely as per the author. Mumbai Live holds no opinion on the content of the article and does not promote any particular view or sentiment.

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा