Advertisement

सचिन, विनोदची जोडी खेळणार नवी इनिंग!

सचिनने माझ्यासमोर प्रशिक्षणाचा प्रस्ताव मांडताच मी त्याला लगेच होकार दिला. माझं एक स्वप्न साकार होत आहे. सचिनने दिलेली माझ्यासाठी ही एक मोठी संधी आहे. त्याच्यासोबत नव्या खेळाडूंना प्रशिक्षण देताना पुन्हा जुन्या आठवणी ताज्या होतील, अशी प्रतिक्रिया कांबळीने दिली.

सचिन, विनोदची जोडी खेळणार नवी इनिंग!
SHARES

शालेय क्रिकेट स्पर्धांमध्ये मुंबईतील मैदानं गाजवणारी सचिन तेंडुलकर आणि विनोद कांबळी यांची जोडी पुन्हा एकदा नव्या इनिंगसाठी सज्ज झाली आहे. ही जोडी मिळून उदयोन्मुख खेळाडूंना क्रिकेटचे धडे देणार आहे. सचिनने इंग्लिश काउंटी मिडलसेक्ससोबत 'तेंडुलकर-मिडलसेक्स अॅकॅडमी' नावाची एक क्रिकेट प्रशिक्षण अॅकॅडमी सुरू केली आहे. या अॅकॅडमीच्या माध्यमातूनच हे दोघेही नवीन खेळाडूंना प्रशिक्षण देणार आहेत.


चर्चेतली जोडी

१९८८ मध्ये शालेय क्रिकेट स्पर्धेत खेळताना दोघांनी ६६४ धावांची भागीदारी केली होती. तेव्हापासून सचिन आणि विनोदची जोडी आंतरराष्ट्रीय स्तरावर प्रसिद्ध आहे. सचिनने या अॅकॅडमीत प्रशिक्षण देण्याविषयी विचारणा करताच विनोदने त्याला तात्काळ होकार दिला. त्यानुसार हे दोघेही मुंबईतील विविध मैदानांवर जाऊन युवा प्रतिभावान क्रिकेटपटूंचा शोध घेऊन त्यांना अॅकॅडमीत प्रशिक्षित करणार आहेत.


स्वप्न साकार

सचिनने माझ्यासमोर प्रशिक्षणाचा प्रस्ताव मांडताच मी त्याला लगेच होकार दिला. माझं एक स्वप्न साकार होत आहे. सचिनने दिलेली माझ्यासाठी ही एक मोठी संधी आहे. त्याच्यासोबत नव्या खेळाडूंना प्रशिक्षण देताना पुन्हा जुन्या आठवणी ताज्या होतील, अशी प्रतिक्रिया कांबळीने दिली.


मतभेद दूर

काही वर्षांपूर्वी दोघांमध्ये दुरावा निर्माण झाला होता. सचिनने रिटायरमेंटनंतरच्या पार्टीला कांबळीला बोलवलं नव्हतं. त्यावेळी सचिन आपल्याला विसरला अशी प्रतिक्रिया कांबळीने दिली होती. पण या नव्या इनिंगवरून दोघांमधील मतभेद दूर झाल्याचं दिसत आहे.


कॅम्पचं आयोजन कुठे?

'तेंडुलकर-मिडलसेक्स अॅकॅडमी' राज्याच्या वेगवेगळया भागांमध्ये ट्रेनिंग कॅम्प आयोजित करतानाच युवा प्रतिभावान क्रिकेटपटूंचा शोध घेणार आहे. १ ते ४ नोव्हेंबर दरम्यान नेरुळच्या डी.वाय. पाटील स्टेडियममध्ये त्यानंतर ६ ते ९ नोव्हेंबर दरम्यान वांद्रे एमआयजी क्लब येथे कॅम्प आयोजित करण्यात आला आहे. हे कॅम्प ७ ते १७ आणि १३ ते १८ वयोगटातील क्रिकेटपटूसाठी असेल. तर १२ ते १५ नोव्हेंबर आणि १७ ते २० नोव्हेंबर दरम्यान पुणे इथंही कॅम्प होईल.



हेही वाचा-

दिल्लीला नमवून मुंबईने पटकावली विजय हजारे ट्राॅफी

पृथ्वी शॉला मिळणार का विश्वचषकात संधी?



Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा