Advertisement

शिवाजी पार्क सुपरस्टार्सची उपांत्य फेरीकडे कूच


शिवाजी पार्क सुपरस्टार्सची उपांत्य फेरीकडे कूच
SHARES

साई- मुंबई मास्टर्स प्रीमिअर लीगमध्ये शिवाजी पार्क सुपरस्टार्सने विजयी सलामी दिल्यानंतर पुढच्या दोन सामन्यात त्यांना पराभव पत्करावा लागला होता. मात्र त्यानंतर शिवाजी पार्क संघाने जोमाने मुसंडी मारत दोन सामन्यात विजय मिळवून उपांत्य फेरीच्या दिशेने कूच केली अाहे. मरीन ड्राइव्ह येथील पोलीस जिमखान्यावर रविवारी झालेल्या दुसऱ्या सामन्यात शिवाजी पार्क सुपरस्टार्सने अखेरच्या षटकांत पुन्हा एकदा थरारक विजयाची नोंद केली. जुहू हिरोज संघावर अवघ्या एका धावेने विजय मिळवत शिवाजी पार्क सुपरस्टार्सने पाच सामन्यांत तीन विजयासह सहा गुणांनिशी ब गटात दुसरे स्थान पटकावले अाहे. जुहू हिरोज, शिवाजी पार्क अाणि सांताक्रूझ क्रॅकर्सचे प्रत्येकी सहा गुण झाले असून उपांत्य फेरीत मजल मारण्यासाठी शिवाजी पार्कला अखेरच्या लीग सामन्यात विजय मिळवणे क्रमप्राप्त अाहे.


अमर पाध्येची अर्धशतकी खेळी

शिवाजी पार्कने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. सलामीवीर अाणि गेल्या सामन्यातील सामनावीर किरण रामायाने अाणि अमर पाध्ये यांनी ८२ धावांची सलामी दिली. किरण ११ धावांवर माघारी परतला, पण अमरने ३० चेंडूंत १० चौकार अाणि ३ षटकारांसह ६८ धावा तडकावल्या. स्पर्धेत सर्वाधिक धावा (२६८) फटकावणाऱ्यांच्या यादीत तो दुसऱ्या क्रमांकावर अाहे. त्यानंतर केदार कांगोने (३२) धुव्वाधार फलंदाजी करत शिवाजी पार्क सुपरस्टार्सला १७ षटकांत ७ बाद १५९ धावा उभारून दिल्या.


अखेरच्या षटकांत जुहूने चार विकेट्स अाणि सामनाही गमावला

प्रतिक पाटील अाणि विपीन चौरसिया यांनी ७२ धावांची सलामी देत जुहू हिरोजला विजयाच्या दिशेने मजल मारून दिली. विपीनने ५३ धावा तर प्रतिकने ४२ धावा फटकावल्या. मधल्या फळीतील सागर घाडीगांवकर (३१) वगळता जुहू हिरोजच्या एकाही फलंदाजाला मोठी धावसंख्या उभारण्यात अपयश अाले. जुहू हिरोजला अखेरच्या षटकांत विजयासाठी पाच धावांची अावश्यकता होती. पण योगेश पटेलने सुरेख गोलंदाजी करत चार फलंदाजांना बाद केले. त्यापैकी दोन फलंदाज धावचीत होऊन माघारी परतले. त्यामुळे शिवाजी पार्क सुपरस्टार्सला एका धावेने निसटता विजय मिळवता अाला.

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा