Advertisement

शिवाजी पार्क सुपरस्टार्सचा मुलुंडविरुद्ध थरारक विजय


शिवाजी पार्क सुपरस्टार्सचा मुलुंडविरुद्ध थरारक विजय
SHARES

मुलुंड मास्टरब्लास्टरची तुफानी फलंदाजी… शेवटच्या षटकांत विजयासाठी हव्यात १६ धावा… किरण रामायानेने पहिल्या ५ षटकांत १२ धावा दिल्या… आता शेवटच्या चेंडूवर ४ धावांची गरज… मैदानावरील उपस्थितांचे श्वास रोखलेले… खेळाडूंच्याही हृदयाची धडधड वाढलेली… अखेर किरण रामायानेने शेवटचा चेंडू निर्धाव टाकला आणि शिवाजी पार्क सुपरस्टार्सने एका थरारक विजयाची नोंद केली. शिवाजी पार्क सुपरस्टार्सने विजयासाठी ठेवलेले उद्दिष्ट गाठताना मुलुंड मास्टरब्लास्टरला विजयासाठी तीन धावा कमी पडल्या. या कामगिरीसह शिवाजी पार्कने साई-एमएमपीएल स्पर्धेतील दुसरा विजय मिळवून बाद फेरीतील आव्हान कायम राखले आहे.


अमर पाध्येची दमदार सलामी

शिवाजी पार्कने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. सलामीवीर अमर पाध्ये आणि केदार कांगो यांनी धुव्वाधार फलंदाजी करत हा निर्णय सार्थ ठरवला. केदार कांगो (८) पायचीत होऊन झटपट माघारी परतला तरी अमर पाध्येने मात्र दमदार फलंदाजीचे प्रदर्शन करत ३० चेंडूंत ७ चौकार आणि ३ षटकारांसह ५८ धावा फटकावल्या. मात्र शिवाजी पार्कच्या मधल्या फळीतील फलंदाजांनी निराशा केली. शाम रामकुमार (८), कर्णधार निशांत सबनीस (२), प्रशांत गावडे (०) यांनी सपेशल शरणागती पत्करली. त्यानंतर किरण रामायाने याने ३६ धावांची खेळी करत शिवाजी पार्कचा डाव सावरला. त्यामुळे शिवाजी पार्क सुपरस्टार्सने १८ षटकांत ९ बाद १७० धावांपर्यंत मजल मारली. विवेक प्रभू याने तीन तर तुषार धारगळकर आणि मारझूक सय्यद यांनी प्रत्येकी दोन विकेट्स मिळवल्या.


मुलुंडच्या फलंदाजांची हाराकिरी

अमेय रेडकर आणि अंकित जैन यांनी मुलुंड मास्टरब्लास्टरला दमदार सुरुवात करून दिली. या दोघांनी अनुक्रमे ४६ आणि ४९ धावा फटकावत मुलुंडला ९९ धावांची सलामी दिली. मात्र त्यानंतर मुलुंडचा डाव पत्त्याच्या डावाप्रमाणे कोसळला. सिद्धार्थ नाईक याने २१ धावांची खेळी केली, मात्र बाकीच्या फलंदाजांनी निराशा केल्यामुळे मुलुंडला विजय साकारता आला नाही.

Read this story in English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा