Advertisement

शिवाजी पार्क सुपरस्टार्सला सलग दुसऱ्यांदा पराभवाचा धक्का


शिवाजी पार्क सुपरस्टार्सला सलग दुसऱ्यांदा पराभवाचा धक्का
SHARES

विजेतेपदाचा प्रबळ दावेदार समजल्या जाणाऱ्या शिवाजी पार्क सुपरस्टार्स संघाला साई-मुंबई मास्टर्स प्रीमिअर लीगमध्ये सलग दुसऱ्यांदा पराभवाचा धक्का सहन करावा लागला. रविवारी रात्री मरीन ड्राइव्ह येथील पोलिस जिमखान्यावर रंगलेल्या अटीतटीच्या सामन्यात शिवाजी पार्क सुपरस्टार्सला सांताक्रूझ क्रॅकर्सकडून अवघ्या १० धावांनी पराभव पत्करावा लागला. सांताक्रूझ संघाने रोहन सदरजोशीच्या (६१) दमदार अर्धशतकी खेळीच्या जोरावर शिवाजी पार्कसमोर विजयासाठी १४८ धावांचे उद्दिष्ट ठेवले होते. मात्र तगडे फलंदाज संघात असूनही शिवाजी पार्कला १८ षटकांत ६ बाद १३७ धावाच करता आल्या.


रोहनच्या अर्धशतकाने सांताक्रूझला तारले

डावातील दुसऱ्याच षटकांत आशिष रावच्या (१४) रुपाने सांताक्रूझला पहिला धक्का बसला असताना रोहन सदरजोशीने एक बाजू सांभाळून धरत आपल्या संघाचा डाव सावरण्याचा प्रयत्न केला. दुसऱ्या बाजूने एकाही फलंदाजाची साथ लाभत नसताना रोहन मात्र सांताक्रूझसाठी तारणहार ठरला. त्याने ३९ चेंडूंत ८ चौकार आणि १ षटकारासह ६१ धावांची खेळी साकारली. त्यामुळे सांताक्रूझ क्रॅकर्सला १८ षटकांत ५ बाद १४७ धावा करता आल्या. शिवाजी पार्ककडून दिनेश सावंत सर्वात यशस्वी गोलंदाज ठरला. त्याने दोन विकेट्स मिळवल्या.


शिवाजी पार्कची फलंदाजी गडगडली

विजयासाठीचे १४८ धावांचे आव्हान पेलताना सुधांशू प्रधान (१९) आणि अमर पाध्ये (३९) या सलामीवारींनी शिवाजी पार्क सुपरस्टार्सला सुरेख सुरुवात करून दिली. या दोघांनी पहिल्या विकेटसाठी ७.२ षटकांत ६८ धावांची सलामी दिली. त्यानंतर मात्र शिवाजी पार्कची फलंदाजी गडगडली. किरण रामायाने (५), केदार कांगो (६) आणि शिनोश पानिकर (२) तसंच दिनेश सावंत (८) हे फलंदाज अपयशी ठरल्यानंतर तळाच्या सौरभ जोशी आणि प्रशांत गावडे यांनी शिवाजी पार्कला विजय मिळवून देण्याचा प्रयत्न केला, पण त्यांचे प्रयत्न १० धावांनी तोकडे पडले. सौरभने नाबाद २४ तर प्रशांतने नाबाद २१ धावा फटकावल्या.

Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा