Advertisement

ट्रम्प नाइट्सचा पहिल्यावहिल्या टी-२० मुंबई लीगवर कब्जा


ट्रम्प नाइट्सचा पहिल्यावहिल्या टी-२० मुंबई लीगवर कब्जा
SHARES

अंतिम सामन्याला शोभेल अशा थरारक लढतीत ट्रम्प नाइट्स मुंबई नॉर्थ ईस्ट संघाने विजयासाठी ठेवलेले १८३ धावांचे आव्हान पार करताना शिवाजी पार्क लायन्सला शेवटच्या षटकांत जिंकण्यासाठी २६ धावांची आवश्यकता होती. त्यांचे आठ विकेट्स माघारी परतल्यामुळे ट्रम्प नाइट्सच्या विजयाच्या आशा पल्लवित झाल्या होत्या. पण शिवम दुबेने तीन षटकार आणि एक चौकार लगावत त्यांच्या आशेवर पाणी फेरण्याचा प्रयत्न केला. अखेर शिवम दुबेचे प्रयत्न तीन धावांनी तोकडे पडले आणि ट्रम्प नाइट्सने मुंबई क्रिकेट असोसिएशनतर्फे (एमसीए) आयोजित टी-२० मुंबई लीगच्या पहिल्यावहिल्या जेतेपदावर मोहोर उमटवली.


ट्रम्प नाइट्सची घसरगुंडी

नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना सिद्धार्थ राऊत आणि रॉयस्टन डायस यांच्या वेगवान माऱ्यासमोर ट्रम्प नाइट्सची अक्षरश: घसरगुंडी उडाली. ट्रम्प नाइट्सच्या डावातील पहिल्या टप्प्यावर शिवाजी पार्क लायन्सच्या गोलंदाजांनी पूर्णपणे हुकूमत गाजवली. तिसऱ्या षटकांत लागोपाठच्या दोन चेंडूंवर सिद्धार्थ राऊतने सलामीवर शशांक सिंगला (१०) पायचीत पकडल्यानंतर सुमित घाडीगावकरचा (०) त्रिफळा उडवला. त्यानंतरच्या षटकांत रॉयस्टन डायसने लागोपाठच्या दोन चेंडूंवर ट्रम्प नाइट्सला आणखी दोन हादरे दिले. त्याने शिखर ठाकूर (५) आणि कल्पेश सावंत (०) याला माघारी पाठवले.


‘सूर्य’कुमार तळपला

ट्रम्प नाइट्सची अवस्था ५ बाद ३४ अशी करत शिवाजी पार्क लायन्सने सामन्यावर पूर्णपणे पकड मिळवली होती. पण परिक्षित वलसंगकर आणि कर्णधार सूर्यकुमार यादव यांनी चौफेर फटकेबाजी करत ट्रम्प नाइट्सचा डाव सावरला. सूर्यकुमारने अआपल्या लौकिकाला साजेशी फलंदाजी करताना ४२ चेंडूंत ७ चौकार आणि ७ षटकारांची आतषबाजी करत नाबाद ९० धावा फटकावल्या. त्याला उत्तम साथ देत परिक्षितने ४९ चेंडूंत ५ चौकार आणि २ षटकारांसह नाबाद ५९ धावांची खेळी केली. या दोघांनी सहाव्या विकेटसाठी १४८ धावांची अभेद्य भागीदारी रचली. त्यामुळे ट्रम्प नाइट्सला २० षटकांत ५ बाद १८२ धावा उभारता आल्या.


शिवाजी पार्कची आश्वासक सुरुवात

शिवाजी पार्कने १८३ धावांचे आव्हान गाठताना सलामीवीर पॉल वल्थाटी (६) याची विकेट पहिल्याच षटकांत गमावली तरी सिद्धार्थ आक्रे (१०) आणि ब्रविश शेट्टी यांनी संघाचा डाव सावरला. दोघांनी दुसऱ्या विकेटसाठी ३७ धावा जोडल्या. ब्रविश (३२) आणि सिद्धार्थ माघारी परतल्यानंतर अल्पेश रामजानी आणि हार्दिक तामोरे यांनी शिवाजी पार्कला विजयाच्या दिशेने वाटचाल करून दिली.


वैभव सिंगचे दोन हादरे

अल्पेश रामजानी आणि हार्दिक तामोरे ही जोडी मैदानावर स्थिरावली असताना शिवाजी पार्क लायन्स विजयी लक्ष्य गाठेल, असे वाटले होते. पण वैभव सिंगने १७ व्या षटकांत दोघांनाही पॅव्हेलियनमध्ये पाठवत शिवाजी पार्कच्या स्वप्नांना सुरूंग लावला. अल्पेश रामजानीची खेळी ४८ धावांवर संपुष्टात आली तर हार्दिक ३९ धावा काढून माघारी परतला.


शिवम दुबेची झुंज व्यर्थ

तळाचे फलंदाज एकापाठोपाठ माघारी परतत असताना शिवम दुबेने एकहाती किल्ला लढवण्याचा प्रयत्न केला. शेवटच्या षटकांत विजयासाठी २६ धावांची आवश्यकता असताना त्याने तीन षटकार आणि एका चौकाराची आतषबाजी केली खरी. पण त्याची ही झुंज शिवाजी पार्कला विजेतेपद मिळवून देण्यात व्यर्थ ठरली. ट्रम्प नाइट्सकडून वैभव सिंगने तीन विकेट्स मिळवल्या. नाबाद ९० धावंची खेळी करणारा सूर्यकुमारला सामनावीर म्हणून गौरविण्यात आले.

Read this story in English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा