• वांद्र्यात लिफ्टला आदळून 12 वर्षीय मुलीचा मृत्यू
SHARE

मुंबईच्या वांद्रे परिसरातील एका 12 वर्षीय मुलीचा लिफ्टला आदळून दुर्दैवी मृत्यू झाला आहे. कुनूत आरिफ झवेरी असं या मुलीचं नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वांद्र्याच्या बेहरामपाडा इथल्या आशियाना इमारतीतील सहाव्या मजल्यावर कुनूत राहत होती. शुक्रवारी संध्याकाळी कुनूत आणि तिची आतेबहीण खेळण्यासाठी खाली उतरत होते. त्यासाठी त्यांनी लिफ्टचं बटण दाबलं. या मजल्यावरील लिफ्टच्या प्रवेशद्वाराला लावलेली काच बऱ्याच दिवसांपासून तुटलेली असल्याने लिफ्ट खाली येतेय की नाही हे पाहण्यासाठी कुनूत त्या फटीतून खाली डोकावली.

मात्र तिचं नशीब एवढं खराब होतं की त्यावेळी लिफ्ट सातव्या मजल्यावरून खाली येत होती. कुनूत डोकं बाहेर काढणार इतक्यात वरून खाली येणारी लिफ्ट तिच्या डोक्याला जोरात आदळली. हा आघात एवढा जबर होता की कुनूत मागच्या बाजूला पडली.

या दुर्घटनेत तिच्या डोक्याला आणि हनुवटीला मार बसल्याची माहिती निर्मल नगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक वासुदेव जमदाडे यांनी दिली. तिला तात्काळ भाभा रुग्णालयात दाखल करण्यात आलं. मात्र तोपर्यंत फार उशीर झाला होता. सध्या निर्मलनगर पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत.

संबंधित विषय
ताज्या बातम्या