१२वीमध्ये नापास झाल्यामुळे मुलानं संपवली जीवनयात्रा


SHARE

बारावी सीबीएसईच्या निकालात दोन विषयांत नापास झाल्याने एका विद्यार्थ्याने आत्महत्या केल्याची घटना सानपाडा येथे घडली. पृथ्वी सचिन वाव्हळ असे आत्महत्या केलेल्या विद्यार्थ्याचे नाव आहे. तो अभिनेत्री क्रांती रेडकर हिचा भाचा असून, घटनेची माहिती मिळताच त्यांनी रविवारी दुपारी घटनास्थळी भेट दिली. आत्महत्येपूर्वी पृथ्वीने 'मी तुमची सेवा करू शकलो नाही, मला माफ करा' अशी चिठ्ठी लिहिली होती. पृथ्वी हा सानपाडा सेक्टर 13 येथील शंकर टॉवरमध्ये सहकुटुंब रहात होता. रविवारी बारावीचा सीबीएसईचा निकाल त्याने तपासला. यावेळी त्याला आपण दोन विषयात नापास झाल्याचे समजले. या नैराश्येत त्याने राहत्या घरात गळफास लावून आत्महत्या केली. त्याच्या घरातील सगळेच गावी गेल्याने त्याच्या घरी कुणीच नव्हते. निकालानंतर त्याचे काही मित्र त्याच्या घरी आले. मात्र, दरवाजा वाजवूनही तो उघडला न गेल्यामुळे त्याच्या मित्रांनी शेजाऱ्यांना सांगितले. दरम्यान, काहींनी सानपाडा पोलिसांना कळवून घराचा दरवाजा तोडला. या वेळी घरामध्ये पृथ्वीचा मृतदेह आढळला.

संबंधित विषय
ताज्या बातम्या