'तो' स्टंट बॉय आहे जिवंत !

चर्नी रोड- लोकलमध्ये चर्नी रोड आणि मारिन लाईन्स दरम्यान स्टंट करताना फटका बसलेला मुलगा हा मेलेला नसून जिवंत आहे. हा मुलगा भाईंदरचा राहाणार आहे. तीस ऑक्टोबरला रेल्वेत स्टंट करताना त्याचा अपघात झाला होता. त्याला केवळ दोन ते तीन टाके पडले आहेत. ज्या पद्धतीनं हा मुलगा इलेक्ट्रिक पोलला आपटला ते बघून सगळ्यांनाच हा मुलगा जिवंत आहे का? असा प्रश्न पडला होता. व्हिडियो वायरल झाल्याने पोलिसांनी देखील तपास सुरू केला होता. पोलिसांनी फेसबुकच्या माध्यमातून या मुलाचा छडा लावला आणि त्याला भाईंदरवरून बोलावून घेतलं. रेल्वे पोलिसांनी मुलाला दंड ठोठावलाय. मात्र हा मुलगा अल्पवयीन असल्यानं त्याला अटक करणं मात्र पोलिसांनी टाळलंय. सोमवारी त्याला जुवेनाईल कोर्टात हजर राहण्याचे आदेश पोलिसांनी दिलेत.

मारिन लाईन्स आणि चर्नी रोड दरम्यान स्टंट करताना हा मुलगा पडला. त्याच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. त्याचे मित्र पुढील स्थानकात उतरून त्याला वाचवण्यासाठी धावले. त्याला व्यवस्थित बघून त्यांच्याही जिवात जीव आला. त्याला थोडीशी मलमपट्टी करून सगळे घरी गेले. मात्र घरच्यांच्या भीतीनं त्यानं घडलेला प्रकार कुणालाही सांगितला नाही. आपला बाईक अपघात झाल्याचं त्यानं घरी सांगितलं. ज्यावेळी व्हिडियो वायरल झाला तेव्हा कुटुंबियांच्या पायाखालची जमीन सरकली. कुटुंबियांनी जाब विचारला तेव्हा त्यानं घडलेली घटना सांगितली.

Loading Comments