मधुचंद्राच्या रात्री घात झाला, अंथरूणात 'ती' ऐवजी 'तो' निघाला!


मधुचंद्राच्या रात्री घात झाला, अंथरूणात 'ती' ऐवजी 'तो' निघाला!
SHARES

लग्न होतं न होतं जोडप्याला आस लागते ती मधुचंद्राची..! पहिल्या रात्रीची रोमँन्टीक स्वप्न ही जोडपी मोठ्या खुबीनं रंगवतात अन् या रम्य रात्रीत जोडीदाराच्या प्रेमात आकुंठ बुडतात. अशा स्वप्नरंजनात रंगून आपल्या जोडीदारासोबत मधुचंद्राला गेलेल्या एका तरूणाचा मात्र पहिल्याच रात्री घात झाला. कारण त्याचा जोडीदार 'ती' नव्हे, तर चक्क 'तो' निघाला. आपली फसवणूक झाल्याचं लक्षात आल्यानंतर तरूणाने तरूणी आणि तिच्या कुटुंबियांविरोधात शिवाजी नगर पोलिस ठाण्यात लेखी तक्रार नोंदवली आहे.


प्रेमात झाला आंधळा

गोवंडी परिसरात राहणाऱ्या एका २१ वर्षीय तरूणाची वांद्रे येथील काॅलेजमध्ये शिक्षण घेत असताना १९ वर्षीय तरुणीशी ओळख झाली. या ओळखीतून दोघेही एकमेकांचे मित्र झाले अन् पुढं या मैत्रीचं रुपांतर प्रेमात झालं. दोघांनीही एकमेकांसोबत कायम राहण्याच्या आणाभाकाही घेतल्या. सर्व काही सुरळीत सुरू असताना. तरूणीच्या कुटुंबियांना दोघांच्या प्रेम प्रकरणाविषयी कळलं. तरूणीच्या कुटुंबाने तातडीने तरूणाची भेट घेत त्याला लग्नाची अट घातली.


कटू सत्य

त्यानुसार तरूणाने आपल्या कुटुंबियांसोबत येऊन लग्नाची रितसर बोलणी केली. त्यावेळी तरूणीच्या वडिलांनी माझी मुलगी वैद्यकीय कारणांमुळे आई होऊ शकणार नाही, असं तरूणाच्या कुटुंबाला सांगितलं. मात्र आपल्या एकुलत्या एक मुलाच्या प्रेमापोटी तरूणाच्या कुटुंबानेही तरूणीला पदरात घेण्याचं ठरवलं.


कब्रस्तानमध्ये लग्न

२५ जानेवारी २०१८ लग्नाची तारीख ठरली. तरूणीच्या कुटुंबाने 'न्यू हज कमिटी', सीएसटी येथील हॅालही बुक केला. मात्र लग्नाच्या १५ दिवस अगोदर अचानक हाॅल रद्द केला. ऐनवेळी दोघांचं लग्न माहिमच्या कबरस्तानमध्ये लावण्यात आलं. या गोष्टीमुळे तरूणाच्या घरचे चांगलेच नाराज झाले. मात्र मुलाच्या संसारापुढे त्यांनी आपले सर्व रितीरिवाज बाजूला ठेवले.



संबंधांना टाळाटाळ

लग्न झाल्यानंतर तरूणाच्या वडिलांनी दुसऱ्याच दिवशी दोघांना मधुचंद्रासाठी कुलू-मनाली इथं पाठवलं. तिथं गेल्यावर मात्र तरूणाच्या उत्साहावर पाणी फेरलं. कारण नववधू आपल्याला हार्नियाचा त्रास असल्याचं सांगून तरूणाच्या जवळ जाण्यास टाळू लागली. त्यानंतर पाठीच्या मणक्यात पाणी भरल्याने शस्त्रक्रीया झाल्याचं सांगत वेळ मारून नेऊ लागली.


अखेर दिली कबुली

अखेर असं कुठलंही दुखणं तिला नसल्याचं तरूणाला कळाल्यावर तिने आपण 'ती' नसून 'तो' असल्याचं सांगताच तरूणाच्या पायाखालची वाळू सरकली. आपण 'व्हिजिनोप्लास्टी' केल्याची कबुलीही तिने दिली. सोबतच घरच्यांना हा प्रकार सांगितल्यास आत्महत्या करण्याची धमकी दिली.


प्रकरण दाबण्याचा प्रयत्न

या प्रकरणामुळे तरूण मानसिकरित्या खचल्यावर त्याच्या कुटुंबाने केलेल्या आग्रहानंतर सर्व प्रकार उघडकीस आला. याचा जाब तरूणीच्या कुटुंबियांना विचारल्यावर त्यांनी भाडोत्री गुंडाचा आधार घेत तलाक देण्यास तसंच वैद्यकीय चाचणीसही नकार दिला.


पोलिसांत तक्रार

दुसरीकडे तरूणीच्या वडिलांशी संपर्क साधला असता. त्यांनी तरूणाच्या घरातले आपल्या मुलीला वारंवार त्रास देतात, तिच्यात काही दोष नसून तिच्यावर फक्त हार्नियाची शस्त्रक्रिया झाल्याचं त्यांनी सांगितलं. आपली फसवणूक झाल्याचं लक्षात आल्यानंतर तरूणाने आता मुलगी आणि तिच्या कुटुंबियांविरोधात शिवाजी नगर पोलिस ठाण्यात लेखी तक्रार नोंदवली आहे. या प्रकरणी वस्तुस्थिती पडताळून योग्य ती कारवाई करू, अशी माहिती वरिष्ठ पोलिस निरीक्षक दिपक पगारे यांनी दिली.

Read this story in English
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा