मुंबई विमानतळावर बॅगेज चोरीची 26 प्रकरणं अद्याप अनसॉल्व्हड

CCTV कव्हरेज वाढवण्याची पोलिसांची मागणी

मुंबई विमानतळावर बॅगेज चोरीची 26 प्रकरणं अद्याप अनसॉल्व्हड
SHARES

मुंबई विमानतळावरील बॅगेज चोरीच्या वाढत्या तक्रारींमुळे सहार पोलिसांनी विमानतळावरील CCTV कव्हरेज वाढवण्याची मागणी केली आहे. प्रवाशांचे सामान कन्व्हेयर बेल्टवरून विमानात लोड होईपर्यंत ज्या भागातून जाते, त्या ठिकाणी CCTVच्या माध्यमातून अधिक प्रभावी देखरेख करण्याची गरज पोलिसांनी व्यक्त केली आहे.

पोलिसांच्या मते, विमानतळावरील काही भागांमध्ये असलेले कथित CCTV कव्हरेजमधील अंतर आणि आउटसोर्स केलेले लोडर्स तसेच ग्राउंड-हँडलिंग कर्मचाऱ्यांचा सहभाग यामुळे बॅगेज चोरीतील आरोपींपर्यंत पोहोचण्यात अडचणी येत आहेत.

26 बॅगेज चोरीची प्रकरणं अद्याप अनसॉल्व्हड

पोलिसांच्या माहितीनुसार, जानेवारी 2025 ते सप्टेंबर 2026 दरम्यान सहार पोलिसांनी 21 FIR दाखल केले, तर विमानतळ पोलिसांनी आणखी 5 गुन्हे दाखल केले. त्यामुळे बॅगेज चोरीच्या प्रकरणांची एकूण संख्या 26 झाली आहे.

विशेष म्हणजे, या 26 पैकी एकाही प्रकरणाचा तपास अद्याप पूर्ण झालेला नाही आणि चोरीचा मुद्देमालही परत मिळालेला नाही, असा पोलिसांचा दावा आहे.

या प्रकरणांमध्ये सुमारे 38.5 लाख रुपयांची रोकड, तसेच अंदाजे 67 लाख रुपये किमतीचे सोने आणि हिऱ्यांचे दागिने चोरीला गेल्याची नोंद आहे.

पोलिसांकडे दर महिन्याला बॅगेज चोरीच्या सुमारे 20 तक्रारी येत असल्याचेही अधिकाऱ्यांनी सांगितले. मात्र, यातील अनेक तक्रारी FIRपर्यंत पोहोचत नाहीत. अनेक प्रवासी परदेशात राहत असल्याने तक्रारीचा पाठपुरावा करण्यासाठी मुंबईत परत येणे त्यांना शक्य होत नाही.

विमानतळावरील 'ब्लाइंड स्पॉट्स'वर पोलिसांचा आक्षेप

पोलिसांनी डिसेंबर 2025 ते फेब्रुवारी 2026 दरम्यान Airports Authority of India, मुंबई विमानतळाचे संचालन करणाऱ्या Adani Groupच्या Mumbai International Airport Ltd (MIAL) आणि इतर संबंधित यंत्रणांना पत्रे पाठवल्याचे सांगितले आहे.

कन्व्हेयर बेल्टपासून विमानात सामान लोड करण्यापर्यंत बॅग अनेक टप्प्यांतून जात असल्याने या मार्गावरील काही भाग चोरीसाठी संवेदनशील ठरू शकतात, असा पोलिसांचा संशय आहे.

याशिवाय, एखाद्या बॅगपर्यंत नेमका कोणता कर्मचारी पोहोचला होता, हे शोधणेही तपास अधिकाऱ्यांसाठी आव्हान ठरत आहे. बॅगेज हाताळणीचे मोठे काम आउटसोर्स लोडर्स आणि थर्ड-पार्टी ग्राउंड स्टाफकडून केले जाते.

मात्र, MIALने पोलिसांचे हे दावे फेटाळले आहेत. अशा प्रकारचे पत्र मिळाले नसल्याचे सांगतानाच विमानतळावरील सर्व भागांमध्ये 24 तास CCTVच्या माध्यमातून देखरेख केली जाते आणि बॅगेज चोरीची जबाबदारी संबंधित विमान कंपन्यांची असल्याचे MIALने म्हटले आहे.

दोन वैद्यकीय विद्यार्थिनींच्या बॅगेजमधून 6.5 लाखांची रोकड गायब

31 ऑगस्ट रोजी दोन भारतीय वैद्यकीय विद्यार्थिनींच्या तक्रारीनंतर सहार पोलिसांनी दोन FIR दाखल केल्यानंतर हे प्रकरण पुन्हा चर्चेत आले.

रशियाला जाणाऱ्या प्रिया गवई या 22 वर्षीय विद्यार्थिनीने तिच्या बॅगेजमधून 2 हजार डॉलर म्हणजेच सुमारे 1.96 लाख रुपये गायब झाल्याची तक्रार केली. इजिप्तएअरच्या विमानाने कैरोमार्गे मॉस्कोला प्रवास केल्यानंतर तिच्या बॅगशी छेडछाड झाल्याचे तिच्या लक्षात आले.

तर सानिका रामपुरकर, 19, हिने तिच्या बॅगेजमधून 4,625 डॉलर म्हणजेच सुमारे 4.5 लाख रुपये गायब झाल्याचे सांगितले. एतिहाद एअरवेजच्या विमानाने प्रवास करताना हे सामान गायब झाल्याचा तिचा आरोप आहे.

दोन्ही विद्यार्थिनी रशियात वैद्यकीय शिक्षण घेत असून, शिक्षण आणि राहणीमानाचा खर्च भागवण्यासाठी कुटुंबीयांनी बचत आणि कर्जातून ही रक्कम जमा केल्याचे त्यांच्या कुटुंबीयांनी सांगितले.

मुंबई-दुबई फ्लाइटमध्ये 23 लाखांहून अधिक रुपयांची चोरी?

आणखी एका प्रकरणात ठाण्यातील दोन महिलांनी मुंबई-दुबई प्रवासादरम्यान 25 हजार डॉलर म्हणजेच 23.6 लाख रुपयांहून अधिक रक्कम चेक-इन बॅगेजमधून चोरीला गेल्याचा आरोप केला आहे.

26 ऑगस्ट रोजी स्पाइसजेटच्या विमानाने प्रवास केल्यानंतर ही रोकड गायब झाल्याचे त्यांनी सांगितले. या प्रकरणी 3 सप्टेंबर रोजी FIR दाखल करण्यात आला.

विमानासाठी नियुक्त केलेल्या लोडर्सची हजेरी तपासावी आणि बॅगेज तपासणीदरम्यान कोणाच्या लक्षात रोकड आली होती का, याचा तपास करावा, अशी मागणी तक्रारदारांनी केली आहे.

दरम्यान, माजी IPS अधिकारी आणि वकील वाय. पी. सिंग यांनी इलेक्ट्रॉनिक पुरावे उपलब्ध असूनही प्रकरणांचा तपास न सुटणे ही गंभीर सुरक्षा त्रुटी असल्याचे म्हटले आहे. बॅगेज तपासणी करणारे कर्मचारी आणि लोडर्स यांच्यात संगनमत असण्याची शक्यताही त्यांनी व्यक्त केली आहे. मात्र, हे आरोप अद्याप सिद्ध झालेले नाहीत.

चेक-इन बॅगेजमध्ये मौल्यवान वस्तू ठेवणे टाळा

या घटनांमुळे प्रवाशांच्या चेक-इन बॅगेजमधील मौल्यवान वस्तूंच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.

रोख रक्कम, दागिने आणि इलेक्ट्रॉनिक वस्तू चेक-इन बॅगेजमध्ये न ठेवता हँड बॅगेजमध्ये ठेवण्याचा सल्ला स्पाइसजेटकडून देण्यात आला आहे. चेक-इन सामानात ठेवलेल्या मौल्यवान वस्तूंची जबाबदारी स्वीकारली जात नसल्याचेही विमान कंपनीने स्पष्ट केले आहे.



हेही वाचा

भिवंडीत कुत्र्यांच्या चावण्याच्या घटनांत वाढ

Read this story in English
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा