बोगस प्रमाणपत्र प्रकरणात ३० डाॅक्टर रडारवर

२०१७-१८ या वर्षांत ५८ डॉक्टरांनी सीपीएस महाविद्यालयातून पदव्युत्तर पदविका उत्तीर्ण झाल्याची खोटी प्रमाणपत्रे सादर करून नोंदणी केल्याचे एमएमसीने उघडकीस आणले. यात स्त्रीरोगतज्ज्ञ, अस्थिरोगतज्ज्ञ, मानसोपचारतज्ज्ञ, शल्यविशारद आदी डॉक्टरांचा समावेश आहे. बेकायदेशीररीत्या नोंदणी करून हे डॉक्टर रुग्णांना सेवा देत होते.

बोगस प्रमाणपत्र प्रकरणात ३० डाॅक्टर रडारवर
SHARES

बनावट प्रमाणपत्र तयार करून डाॅक्टरी पेशा स्वीकारलेल्या प्रकरणात आता आणखी ३० डाॅक्टरांची भर पडण्याची शक्यता आहे. महाराष्ट्र वैद्यकिय परिषदेने केलेल्या प्राथमिक तपासणीत ही धक्कादायक बाब उघडकीस आल्यानंतर आग्रीपाडा पोलिसांनी डाॅक्टर स्नेहल ज्ञाती आणि साजिद सुबेदार यांना अटक केली होती. या दोघांच्या चौकशीतून आता ३० अन्य डाॅक्टरांची नावं पुढे आली आहेत.


५८ डॉक्टरांविरोधात गुन्हा दाखल

परळच्या कॉलेज ऑफ फिजिशिअन अ‍ँड सर्जन (सीपीएस) महाविद्यालयातून पदव्युत्तर पदविका उत्तीर्ण झाल्याची खोटी प्रमाणपत्रं सादर करून बेकायदेशीररीत्या नोंदणी करणाऱ्या ५८ डॉक्टरांविरोधात आग्रीपाडा पोलिस ठाण्यात काही दिवसांपूर्वी गुन्हा दाखल करण्यात आला होता. याप्रकरणी महाराष्ट्र वैद्यकीय परिषदेने या डॉक्टरांविरोधात पोलिस ठाण्यात तक्रार नोंदवली होती.


२० डॉक्टर दोषी 

सीपीएस महाविद्यालयाची खोटी प्रमाणपत्रं सादर करून नोंदणी करण्याचा घोटाळा २०१६ साली उघडकीस आला होता. याप्रकरणात २० डॉक्टर दोषी आढळले असून त्यांची नोंदणी रद्द करण्यात आली होती. अशा पद्धतीने सीपीएस महाविद्यालयाची बनावट प्रमाणपत्रं सादर करून एमएमसीकडे नोंदणी केलेल्या विद्यार्थ्यांच्या कागदपत्रांची छाननी एमएससीने सुरू केली.


डॉक्टरांची नोंदणी रद्द

२०१७-१८ या वर्षांत ५८ डॉक्टरांनी सीपीएस महाविद्यालयातून पदव्युत्तर पदविका उत्तीर्ण झाल्याची खोटी प्रमाणपत्रे सादर करून नोंदणी केल्याचे एमएमसीने उघडकीस आणले. यात स्त्रीरोगतज्ज्ञ, अस्थिरोगतज्ज्ञ, मानसोपचारतज्ज्ञ, शल्यविशारद आदी डॉक्टरांचा समावेश आहे. बेकायदेशीररीत्या नोंदणी करून हे डॉक्टर रुग्णांना सेवा देत होते. खोटी प्रमाणपत्रं सादर करून रुग्णांच्या जीवाशी खेळणाऱ्या या डॉक्टरांची नोंदणी एमएमसीने रद्द केली. खोटी प्रमाणपत्रे पुरवणाऱ्या टोळीचा छडा लावण्यासाठी आग्रीपाडा पोलिस ठाण्यात लेखी तक्रार एमएमसीने दिली होती.


आग्रीपाडा पोलिसांत गुन्हा दाखल

या आधीचा गुन्हा भोईवाडा पोलीस ठाण्यात दाखल झाल्याने हा गुन्हादेखील तिथेच दाखल करण्यात यावा, असं सांगत आग्रीपाडा पोलिस ठाण्यात मात्र गुन्हा दाखल करण्यास टाळाटाळ केली जात होती. कालांतराने प्रकरणाचं गांभीर्य ओळखून आग्रीपाडा पोलिसांनी गुन्हा नोंदवत तपास सुरू केला.

त्यावेळी नाशिक येथील डाॅक्टर स्नेहल ज्ञाती आणि साजिद सुबेदार यांचा सहभाग आढळून आल्यानंतर पोलिसांनी दोघांना अटक केली. या दोघांच्या चौकशीत अन्य ३० डाॅक्टरांचा समावेश असल्याचे पुढे आल्याने पोलिस या डाॅक्टराबद्दल माहिती गोळा करत असून लवकरच त्यांना देखील अटक करणार असल्याची शक्यता पोलिसांकडून वर्तवण्यात आली आहे.

Read this story in हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा