कांद्याच्या ट्रकमधून ५०० किलो गांजाची तस्करी


कांद्याच्या ट्रकमधून ५०० किलो गांजाची तस्करी
SHARES

शहरात गांजा विक्रीचे लोण पुन्हा एकदा मुंबई पोलिसांसमोर मोठी डोकेदुखी ठरत आहे. गांजाच्या आहारी गेलेल्यांचा वाटमारी प्रकरणात मोठा सहभाग असल्याचा दाट संशय व्यक्त होत आहे. नुकतेच ५०० किलोच्या गांजा तस्करीप्रकरणी अंमली पदार्थ विरोधी पथकाच्या आझाद मैदान युनिटने तिघांना अटक केली असून संजय मोहिते (३६), नंदलाल बेल्दर (५५), काळू मोहिती अशी त्यांची नावे आहेत.


ट्रकभरून गांजा जप्त

मंगळवारी अंमली पदार्थ विरोधीपथकाने विक्रोळी परिसरात केलेल्या कारवाईत ५०० किलोचा गांजा जप्त केला आहे. नाशिक जिल्ह्याच्या मालेगाव येथून हा गांजा एका टेम्पोतून भरून आणण्यात आला होता. याबाबतची माहिती एएनसीच्या आझाद मैदान पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार अंमली पदार्थ विभागाचे पोलिस आयुक्त शिवदीप लांडे यांच्या मार्गदर्शनाखाली सापळा रचून ही कारवाई केली. या गांजाची किंमत १ कोटी ८ लाख रुपये इतकी असल्याची माहिती सूत्रांनी दिली. या प्रकरणी पोलिसांनी तिघांना अटक केली आहे.


कांद्याच्या विक्रीआड गांजाची तस्करी

नाशिकच्या मालेगाव जवळील लासलगाव बाजारपेठेतून शहरात मोठ्या प्रमाणात कांदा विक्रीसाठी येत असतो. ओला कांदा किंवा सोललेल्या कांद्याला प्रचंड वास येत असतो. याच संधीचा फायदा घेत तस्करांनी यावेळी ट्रकभरून म्हणजेच ५०० किलो गांजा ओल्या आणि सोललेल्या कांद्याच्या गोणीत टाकून तस्करीसाठी मुंबईत पाठवले. मात्र तस्करांचा हा प्रयत्न देखील लांडे यांनी हाणून पाडला. पोलिसांनी चौकशी केली असता आरोपींनी या युक्तीची कबुली दिली आहे. ऐवढ्या मोठ्या प्रमाणात जप्त केलेला गांजा शहरात कुणाच्या सांगण्यावरून आणण्यात आला होता. तसेच या गांजाची विक्री कुठे-कुठे करण्यात येणार होती. याचा आता परिपूर्ण न्यूट्रोफिल गणना (एएनसी) चे पोलिस शोध घेत आहेत. तसेच आरोपींनी यापूर्वीही अशाच पद्धतीने गांजा मुंबई आणल्याचा संशय असल्याची माहिती सूत्रांनी दिली.


पालकांच्या डोळ्यावर प्रेमाची पट्टी

शहरातच नाही तर ग्रामीण भागातील तरुणही गांजा आणि अमंली पदार्थांकडे वळत आहेत. दारुच्या तुलनेत गांजाचा डोस स्वस्तात मिळत असल्याने त्याकडे तरुणांचा कल अधिक असल्याचे दिसून येत आहे. तरुण नशेच्या आहारी जात असताना पालकांच्या डोळ्यावर मायेची पट्टी दिसत आहे.


२६१ किलोचा गांजा हस्तगत

२०१७ मध्ये एएनसी पोलिसांनी विविध भागात ७१ गुन्हे नोंदवले असून गांजा तस्करीच्या गुन्ह्यात आतापर्यंत ९२ जणांना अटक केली आहे. तर २०१७ या वर्षात २६१ किलोचा गांजा हस्तगत केला. ज्याची किंमत ४ कोटी ३६ लाखांच्या घरात आहे.   

Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा