ट्विटरवरील तक्रारीनंतर संजय पांडेंची कारवाई, ७ पोलिसांची बदली

मुंबईचे पोलीस आयुक्त संजय पांडे यांनी सात पोलिसांची तडकाफडकी बदली केलीय.

ट्विटरवरील तक्रारीनंतर संजय पांडेंची कारवाई, ७ पोलिसांची बदली
SHARES

मुंबईचे (Mumbai) पोलीस आयुक्त संजय पांडे (Sanjay Pandey) यांनी सात पोलिसांची (Police) तडकाफडकी बदली केलीय. मुंबईतील समतानगर पोलीस ठाण्यात पासपोर्ट नूतनीकरणासाठी आलेल्या व्यक्तीला कथित मारहाण केल्याच्या आरोपावरुन ही कारवाई करण्यात आली आहे.

संजय पांडे यांच्याकडे ट्विटद्वारे ही तक्रार करण्यात आली होती. समता नगर पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक आनंदराव हाके, पोलीस निरीक्षक रवींद्र पडवळ, पोलीस उपनरीक्षक भागवत व्यवहारे पोलीस शिपाई निलेश राजापुरे, अंजली गवळी, अशोक गाढवे आणि प्रशांत ठाकूर यांची नायगाव विभागात बदली करण्यात आली आहे.

मात्र, पोलिसांनी देखील संबंधित व्यक्तीवर कर्नाटकात गुन्हा दाखल असल्याचं म्हटलंय. बदलीच्या कारवाईनं पोलिसांमध्ये नाराजी असल्याच्या चर्चा सुरू आहेत.

संजय पांडे यांच्या पासपोर्ट नूतनीकरणासाठी आलेल्या व्यक्तीच्या मुलीनं तक्रार केली होती. कांदिवलीतील एक व्यक्ती पासपोर्ट नूतनीकरणासाठी समतानगर पोलीस ठाण्यात आली होती.

पोलिसांनी कागदपत्रांची शहानिशा केली असता त्याच्यावर कर्नाटकात गंभीर गुन्हा दाखल आहे. ते प्रकरण न्यायप्रविष्ठ असल्याचं पोलिसांना समजलं. त्यामुळं पोलिसांनी अर्जावर काहीच कारवाई केली नसल्याची माहिती होती.

गेल्या एक महिन्यापासून पोलीस आणि त्या व्यक्तीमध्ये वाद सुरू असल्याचं म्हटलं जातंय. या वादातून पोलिसांनी मारहाण केल्याचा आरोप करत तक्रार संबंधित व्यक्तीच्या मुलीनं संजय पांडे यांच्याकडे केली होती. यानंतर संजय पांडे यांनी पोलिसांची बदली केलीय.

संजय पांडे यांनी संबंधित मुलीच्या तक्रारीवरुन बाजू ऐकून न घेता बदली करण्याचे आदेश दिल्याची चर्चा सुरू आहे. सहायक पोलीस आयुक्त राजेंद्र मोहिते यांच्याकडे तपास करुन अहवाल देण्यास सांगण्यात आलं आहे.

मुंबई पोलीस आयुक्त पदाचा कार्यभार स्वीकारल्यानंतर संजय पांडे सोशल मीडियाच्या माध्यमातून मुंबईकरांच्या संपर्कात असतात. मुंबईकरांकडून ते विविध सूचना मागवत असतात. या सात पोलिसांवर कारवाई देखील ट्विटरवर केलेल्या तक्रारीनंतर करण्यात आली आहे.



हेही वाचा

आर्यन खान ड्रग्ज प्रकरण: आरोपपत्र दाखल करण्यासाठी NCBला ६० दिवसांची मुदतवाढ

Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा