आयुक्तांच्या नोटिसीला न जुमानता 'त्या' ८ जणांची नियुक्ती एटीएसमध्ये

गेल्याच महिन्यात देवेन भारती यांंनी एटीएस प्रमुखपदाची सूत्रे हाती घेतल्यानंतर मुंबई पोलिस दलात काम करणाऱ्या १२ अधिकाऱ्यांनी भारती यांच्यासोबत काम करण्यास मिळावे. यासाठी मुंबई पोलिस आयुक्त संजय बर्वे यांना डावलून थेट महासंचालकांकडे अर्ज केले.

आयुक्तांच्या नोटिसीला न जुमानता 'त्या' ८ जणांची नियुक्ती एटीएसमध्ये
SHARES

मुंबई पोलिस दल आणि दहशतवादविरोधी पथक (एटीएस) यांच्यातील चढाओढीला आयुक्तांनी पाठवलेल्या कारणे दाखवा नोटिसीमुळे पूर्ण विराम मिळेल असं वाटलं होतं. मात्र आयुक्तांच्या कारणे दाखवा नोटिसीला न जुमानता विशेष पोलिस महानिरीक्षक (आस्थापना) राजेश प्रधान यांनी मुंबई पोलिस आयुक्तांंनी नोटीस पाठवलेल्यांपैकी आठ अधिकाऱ्यांची थेट दहशतवाद विरोधी पथकात नियुक्ती करण्यात आली असल्याचे फर्मान काढल्याने हा वाद आणखी चिघळणार असल्याचं दिसून येतं. 


आयुक्तांचा कडक पवित्रा

मुंबई पोलिस दलात पूर्वीपासूनच अंतर्गत वाद पहायला मिळालेत. मात्र, त्याची कुठेही वाच्यता व्हायची नाही. गेल्याच महिन्यात देवेन भारती यांंनी एटीएस प्रमुखपदाची सूत्रे हाती घेतल्यानंतर मुंबई पोलिस दलात काम करणाऱ्या १२ अधिकाऱ्यांनी भारती यांच्यासोबत काम करण्यास मिळावे. यासाठी मुंबई पोलिस आयुक्त संजय बर्वे यांना डावलून थेट महासंचालकांकडे अर्ज केले. त्यावर १२ अधिकाऱ्यांनी बदलीसाठी केलेला अर्ज मुंबई पोलिस दलाच्या शिस्तप्रियतेला धरून नसल्याचा ठपका ठेवत आयुक्त संजय बर्वे यांनी १२ जणांंना कारणे दाखवा नोटीस बजावली. या नोटीसांमुळे पोलिस दलातील वाद चव्हाट्यावर आला. आयुक्तांच्या कडक पवित्र्यामुळे मुंबई पोलिसांत खळबळ उडाली.


गुन्हे शाखेचा वचक

मागच्या काही वर्षात अनेक गंभीर गुन्हे महाराष्ट्र एटीएसने हाताळले आहेत. त्यातील काही गुन्ह्यांची उकल होणे बाकी आहे. नियुक्ती करण्यात आलेल्या याच अधिकाऱ्यांनी एकेकाळी गुन्हे शाखेत कार्यरत असताना मुंबई गुन्हे शाखेचा गुन्हेगारांवर चांगलाच वचक ठेवला होता. मुंबईत आतापर्यंत महत्वाच्या अनेक गुन्ह्यांचा तपास हा या १२ अधिकाऱ्यांनी करत, आरोपींना तुरूंगात डांबलं आहे. त्या पार्श्वभूमीवरच यातील अर्ज करणाऱ्या आठ जणांची विशेष पोलिस महानिरीक्षक (आस्थापना) राजेश प्रधान यांनी दहशतवाद विरोधी पथकात बदली केल्याचे नियुक्तीच्या पत्रात म्हटलं आहे. या नियुक्ती पत्रात वरिष्ठ पोलिस निरीक्षक नितीन अलकनुरे, दिनेश कदम, नंदकुमार गोपाळे, द्यानेश्वर वाघ, सुधीर दळवी, राजेश भुयार, उमाकांत अडकी, संतोष भालेकर यांची नावे आहेत.


वातावरण तापलं

या नियुक्तीच्या पत्राची चर्चा सध्या मुंबई पोलिस दलात मोठ्या प्रमाणात होत आहे. आयुक्तांच्या नोटिसीला न जुमानता पोलिस महासंचालकांनी घेतलेल्या या निर्णयामुळे पोलिस दलातील वातावरण चांगलेच तापलेले आहे. नियुक्तीच्या पत्रानंतर मुंबई पोलिस आयुक्त संजय बर्वे हे काय भूमिका घेतात याकडं आता सर्वांचं लक्ष लागून राहिलेले आहे.हेही वाचा -संबंधित विषय