लाईफ इन्शुरन्स काढताय? मग हे वाचाच!


लाईफ इन्शुरन्स काढताय? मग हे वाचाच!
SHARES

आपला वृद्धापकाळ सुखात जावा यासाठी जर तुम्ही लाईफ इन्शुरन्स काढत असाल, तर तो कोणत्या कंपनीकडून काढताय? किंवा कुणी तुमची फसवणूक तर करत नाही ना? याची नीट चौकशी करा. नाहीतर आयुष्य शांततेत जाण्याऐवजी उद्ध्वस्त होईल. कारण लाइफ इन्शुरन्सच्या नावाखाली अनेकांना लाखोंचा गंडा घालणाऱ्या अंतरराज्यीय टोळीचा मुंबई गुन्हे शाखा कक्ष 11 ने पर्दाफाश केला आहे. ही टोळी लाईफ इन्शुरन्स काढल्यानंतर काही दिवसांतच परतावा मिळण्याचा दावा करून फसवणूक करायची.


टोळीतील आठ सदस्यांना अटक

या प्रकरणी गुन्हे शाखा कक्ष 11 ने या टोळीतील मुख्य आरोपी कप्तान सिंग चौहान, आशिष कुमार गुप्ता (30), अनिल सिंग राजावत, राजनाथ सिंग चौहान, हरीश गोस्वामी (28), राजा उर्फ अनिल तिवारी (20) रिंकु सोलंकी (24) भूपेंद्र बदोरिया (23) या 8 सदस्यांना अटक केली आहे.

पोलिसांनी त्यांच्याकडून 30 सिम कार्ड आणि 18 लॅपटॉप जप्त केल्याची माहिती गुन्हे प्रकटीकरणचे पोलिस उपायुक्त निसार तांबोळी यांनी दिली. या आरोपींच्या बॅंक अकाऊंटमध्ये लाखो रुपये असल्याचा दावा गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्यांनी केला आहे.


अशी करत होते फसवणूक

या टोळीचा म्होरक्या कप्तान सिंग आणि आशिष कुमार गुप्ता हे दोघेही याआधी इन्शुरन्स कंपनीत काम करत होते. ही टोळी आधी लोकांना फोन करत असे. त्यानंतर आपण प्रतिष्ठित लाइफ इन्शुरन्स कंपनीतून बोलत असून कंपनीने एक नवीन स्कीम लॉन्च केल्याचे ते ग्राहकांना सांगत असत. या स्कीममध्ये तुम्ही लाईफ इन्शुरन्स काढल्यास तुम्हाला काही दिवसांत हजारोंचा परतावा मिळण्याचे आमिष दाखवायचे (दोन दिवसात 30 हजारांचे 1 लाख रुपये मिळणार). विशेष म्हणजे विश्वास बसावा म्हणून ते लोकांची इन्शुरन्स पॉलिसी देखील काढत. लाखो रुपये लाईफ इन्शुरन्समध्ये गुंतल्यावर त्यांच्या मूळ खेळीला सुरुवात होत असे. त्यानंतर ही टोळी लाईफ इन्शुरन्स काढल्यावर मिळालेल्या विनिंग अमाऊंटसाठी स्वतःच्या खात्यात पैसे टाकायला लोकांना भाग पाडत.

अशाच प्रकारे या टोळीने मालाड येथील व्यापाऱ्याला 22 लाख रुपयांना लुबाडले. एप्रिल 2015 ते फेब्रुवारी 2017 दरम्यान 32 लाख विनिंग अमाऊंट जिंकण्याच्या नावाखाली हा व्यापारी थोडे थोडे करत 22 लाख रुपये या टोळीला देऊन बसला होता. 22 लाख रुपये देऊन सुद्धा विनिंग अमाऊंट काही मिळत नाही, हे समजल्यानंतर त्या व्यापऱ्याने गुन्हे शाखेकडे धाव घेतली.

सुरुवातीला गुन्हे शाखेकडे कोणताही सुगावा नव्हता. पण तपासानंतर अधिकाऱ्यांसह पोलिस निरीक्षक शरद जिने यांना मुख्य आरोपी हा गोव्यातील एका हॉटेलात थांबल्याचे समजले. पण गुन्हे शाखेचे पथक तिथे पोहचेपर्यंत त्याने तिथून पोबारा केला होता. यांच्या शोधासाठी तब्बल 200 हॉटेल्स आणि लॉजेस गुन्हे शाखेने तपासले. त्यानंतर हे आरोप नोएडामध्ये एक बनावट कॉल सेंटर चालवत असल्याची माहिती गुन्हे शाखेला मिळाली. त्यानंतर गुन्हे शाखेच्या पथकाने या कॉल सेंटरवर धाड टाकून सर्व आरोपींना अटक केली.

अशा प्रकारचे गुन्हे हे इतरत्र देखील घडले असून जर तुमची देखील अशीच फसवणूक झाली असल्यास तात्काळ गुन्हे शाखेशी संपर्क साधण्याचे आवाहन पोलिसांनी केले आहे.



हेही वाचा - 

विविध कंपन्यांच्या स्किमद्वारे फसवणूक झालेल्यांना दिलासा


Read this story in हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा