महिलेला अंतर्वस्त्र भेट देणाऱ्यास गोव्यातून अटक

महिला मरिन ड्राईव्ह येथे कुत्र्याला फिरवण्यासाठी व माॅर्निंग वॉकसाठी आली होती. त्यावेळी एक व्यक्ती तिच्या मागेपुढे फिरत होता. त्याने कुत्र्याबाबत विचारताना महिलेला तिचे नाव विचारले होते.

महिलेला अंतर्वस्त्र भेट देणाऱ्यास गोव्यातून अटक
SHARES

चर्चगेट येथे राहणाऱ्या ३३ वर्षीय महिलेला अंतर्वस्त्र भेट म्हणून पाठवणाऱ्या ३६ वर्षीय व्यक्तीला गोव्यातून अटक केली. आरोपीने यापूर्वीही महिलेला अश्लील मेसेज आणि व्हाइस रेकाॅर्डिंग पाठवल्याचे महिलेने तक्रारीत म्हटले आहे. याप्रकरणी मरिन ड्राईव्ह पोलिसांनी विनयभंग व माहिती तंत्रज्ञान गैरवापर कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.

पोस्टाने पार्सल

मरीन ड्राइव्ह परिसरात राहणाऱ्या महिलेला १५  जूनला राहत्या घरी पोस्टाने एक पार्सल आलं होतं. ते पार्सल उघडल्यानंतर महिलेला त्यात तीन पँट व एक चिट्टी मिळाली. त्यात "तीन पॅन्टीस्‌ फक्‍त तुझ्यासाठी... मला विश्‍वास आहे तुला आवडतील...प्लीज त्या घाल..."असा अश्‍लील संदेश लिहिला होता. या प्रकारामुळे घाबरलेल्या  महिलेने पोस्टात चौकशी केली असता ते काळबादेवी येथून आल्याचं निष्पन्न झालं.  महिलेने याप्रकरणी मरीन ड्राईव्ह पोलिसांकडे जून महिन्यात तक्रार केली होती. पोस्टाकडून मिळालेल्या माहितीवरून आरोपी प्रदोष रामकृष्ण नाईक याला गोव्यातील फोंडा परिसरातून अटक करण्यात आली. तपासात आरोपीचे नाव पुढे आल्यानंतर वर्षभरापासून महिलेला त्रास देणारा हाच असल्याचं निष्पन्न झालं.

आरोपीकडून व्हिडिओ कॉल

या सर्व प्रकरणाची सुरूवात ऑक्‍टोबर २०१८ मध्ये झाली होती. ही महिला मरिन ड्राईव्ह येथे कुत्र्याला फिरवण्यासाठी व माॅर्निंग वॉकसाठी आली होती. त्यावेळी एक व्यक्ती तिच्या मागेपुढे फिरत होता. त्याने कुत्र्याबाबत विचारताना महिलेला तिचे नाव विचारले होते. त्यानंतर महिलेला लँडलाईन दूरध्वनी करून तसंच वॉट्‌सअॅपवरून ओळख वाढवण्याचा प्रयत्न करू लागला. त्यावेळी त्याने पाठवलेल्या फोटो व नावावरून मरिन ड्राईव्ह येथे त्यांच्या मागे घुटमळणारा तोच व्यक्ती असल्याचे समजले. आपण बीबीसीआयचा पहिल्या दर्जाचा पंच असल्याचा दावाही त्याने केला होता. महिलेने व्हॉट्‌सअॅपवर त्याला ब्लॉक केले. त्यानंतर तिने स्वतःचा मेसेंजर पाहिला असता आरोपीकडून अनेक व्हीडिओ कॉल व वॉईस मेसेजही आले होते. या सर्व प्रकारानंतर घाबरलेल्या महिलेने आरोपीचे सर्व संदेश सीडीवर साठवून ठेवले होते.


जामीन अर्ज फेटाळला

याप्रकरणी गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलिसांनी टपाल खात्याकडे या पार्सलबाबतची माहिती मागवली. त्यावेळी पार्सल गोव्यातील वास्को रेल्वे स्थानकाजवळील पोस्टातून पाठवण्यात आल्याचं निष्पन्न झालं. त्यानंतर या प्रकरणाचा तपास आरोपीपर्यंत पोहोचला. आरोपीने अटकपूर्व जामिनासाठी मुंबई सत्र न्यायालयात अर्ज केला होता. तो अर्ज न्यायालयाने फेटाळल्यानंतर गोव्यातील वास्को येथील कामाच्या ठिकाणी जाऊन पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतले. त्यानंतर चौकशीअंती त्याला मरिन ड्राईव्ह पोलिसांनी शनिवारी अटक केली. चौकशीत आरोपीने महिलेला वास्को येथील टपाल कार्यालयासह मुंबईतील जीपीओ येथूनही अंतरवस्त्र पाठवल्याचं निष्पन्न झालं आहे.




हेही वाचा  -

सावधान! तुमच्या बेडरूममधल्या हालचाली टिपतोय 'स्मार्ट टीव्ही'

किडनीसाठी होतेय मानवी तस्करी




Read this story in हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा