पोलिसांच्या तावडीतून निसटताना आरोपीचा मृत्यू

 Dindoshi
पोलिसांच्या तावडीतून निसटताना आरोपीचा मृत्यू
Dindoshi, Mumbai  -  

दिंडोशी - बलात्काराच्या आरोपाखाली अटक केलेल्या आरोपीने पोलिसांच्या तावडीतून निसटण्याचा प्रयत्न करताना त्याचा गोराई खाडीत पडून मृत्यू झाल्याची घटना दिंडोशीत मंगळवारी घडली. आरोपी सन्मान पटेलने एका मुलीला लग्नाचे अमिष दाखवत तिच्यावर बलात्कार केल्याची तक्रार दिंडोशी पोलीस ठाण्यात नोंदवण्यात आली होती. 

पीडित मुलीसोबत बातचीत केल्यावर पोलिसांनी बलात्काराच्या आरोपाखाली तक्रार दाखल करून प्रकरण गोराई पोलीस ठाण्याकडे सोपवलं. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आरोपीला बलात्काराच्या आरोपाखाली अटक करण्याच्या आधीच पीडित मुलीने आरे पोलीस ठाण्यात सन्मानविरोधात छेडछाड केल्याची तक्रार दाखल केली होती. मात्र चौकशी केली असता गोराई पोलीस ठाण्यात आरोपी सन्मानविरोधात कारवाई सुरू असल्याची माहिती आरे पोलिसांना मिळाली. त्यानंतर आरे पोलिसांनी सोमवारी आरोपीचा ताबा गोराई पोलिसांकडे दिला. 

सूत्रांच्या माहितीनुसार गोराई पोलीस सोमवारी रात्री सन्मान पटेल (26) या आरोपीला वैद्यकीय तपासणीसाठी नेत असताना त्याने पोलिसांना धक्का देत खाडीच्या दिशेने पळ काढला. घटनेनंतर पोलिसांनी आजूबाजूच्या भागात शोधण्यास सुरुवात केली. पण त्याचा शोध लागला नाही. घटनेच्या दुसऱ्या दिवशी मंगळवारी दुपारी गोराई खाडीत आरोपीचा मृतदेह सापडला. पण आरोपीने आत्महत्या केली की त्याची हत्या झाली? याचा तपास सध्या पोलीस करत आहेत.

Loading Comments