भुज एक्सप्रेसमधील 'त्या' महिलेची हत्या केली तरी कुणी? अटक करण्यात आलेला आरोपी निर्दोष!


SHARE

रेल्वेच्या लांब पल्ल्याच्या गाड्यांमधून एकट्याने प्रवास करणाऱ्या महिला प्रवाशांच्या सुरक्षिततेचा प्रश्न एेरणीवर आणणारी घटना डिसेंबरमध्ये घडली होती. भुज-दादर एक्सप्रेसनं प्रवास करणाऱ्या देरियादेवी चौधरी या महिलेचा गळा चिरून हत्या करण्यात आली होती. या खळबळजनक घटनेनंतर पोलिसांनी सीसीटीव्ही तपासाद्वारे नूरेल्लम मौल्ला याला अटक केली होती. महिलेचा हत्यारा सापडल्यानं पोलिसांनी सुटकेचा निश्वास सोडला होता. मात्र, आता पोलिसांची डोकेदुखी पुन्हा वाढली असून या महिलेची हत्या नेमकी कोणी केली हा प्रश्न निर्माण झाला आहे. कारण पोलिसांकडून अटक करण्यात आलेल्या आरोपीचा या हत्येशी काहीही संबंध नसल्याचं समोर आलं आहे. त्यामुळे पोलिसांनी या व्यक्तिची सुटका करण्यात आली आहे.


सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची तपासणी

९ डिसेंबर २०१८ रोजी सकाळी भुज-दादर एक्सप्रेस दादर स्थानकावर पोहचली, तेव्हा या एक्सप्रेसमध्ये देरियादेवी चौधरी या ४० वर्षीय महिलेची हत्या झाल्याची बाब उघड झाली. त्यानंतर पोलिसांनी यासंबंधी गुन्हा नोंदवत तपास सुरू केला. पोलिसांनी या प्रकरणी दादर रेल्वे स्थानक आणि इतर ठिकाणच्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची तपासणी करण्यास सुरूवात केली. पोलिसांच्या १०० पथकांसह गुन्हे शाखेचे ४० पोलिस या हत्येचा तपास करत होते. पोलिसांनी सूरत ते दादर रेल्वे स्थानकादरम्यानच्या शेकडो सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची तपासणी केली.


निर्दोष म्हणून मुक्तता

या तपासणीनंतर पोलिसांनी नूरेल्लम मौल्लाला अटक केली. अटकेनंतर त्याची चौकशी सुरू केली. त्यानुसार त्याच्याविरोधात ठोस पुरावे मिळवण्यासाठी त्याच्या केसांसह बोटाची नखं, रक्तांची तपासणी कलिनातील वैद्यकिय प्रयोग शाळेच्या माध्यमातून केली. या तपासणीचा अहवाल आठवड्याभरापूर्वी पोलिसांच्या हाती लागला आणि पोलिसांना धक्का बसला. इतकी दिवस केलेला तपास फोल ठरला. कारण अटक करण्यात आलेल्या व्यक्तिबाबत कोणतेही ठोस पुरावे या अहवालातून पोलिसांना मिळाले नाहीत. त्यामुळे शेवटी न्यायालयाकडून नोटीस घेत पोलिसांनी या व्यक्तिला निर्दोष म्हणून मुक्त केलं आहे. पण त्याचवेळी या महिलेचा हत्येकरी कोण हा प्रश्न मात्र आता नव्यानं समोर आला आहे.हेही वाचा -

शाळा-कॉलेजांच्या १०० मीटर परिसरातील २०० पानटपऱ्यांना पोलिसांचा दणका

सर्दी-खोकल्याची औषधं आता मेडीकल स्टोअर्सव्यतिरिक्त 'इथं'ही मिळणारसंबंधित विषय
ताज्या बातम्या