शाळा-कॉलेजांच्या १०० मीटर परिसरातील २०० पानटपऱ्यांना पोलिसांचा दणका

मुंबईतील अनेक शाळा-कॉलेजांजवळ कशी तंबाखु-सिगारेटची विक्री होत आहे आणि शाळकरी मुलांसह-तरूणांना व्यसनाच्या आहारी टाकलं जात आहे याचा पर्दाफाश नुकताच मुंबई पोलिसांनी केला आहे.

शाळा-कॉलेजांच्या १०० मीटर परिसरातील २०० पानटपऱ्यांना पोलिसांचा दणका
SHARES

शाळकरी मुलं आणि कॉलेजच्या मुलांना तंबाखूच्या घातक व्यसनापासून रोखण्यासाठी राज्य सरकारनं सिगारेट आणि तंबाखूजन्य उत्पादन नियंत्रण कायदा २००३ लागू केला आहे. त्यानुसार शाळा-कॉलेजच्या १०० मीटरच्या परिसरात तंबाखू आणि तंबाखूजन्य पदार्थ विक्रीवर कायद्यानं सक्त मनाई आहे. असं असताना हा कायदा धाब्यावर बसवत मुंबईतील अनेक शाळा-कॉलेजांजवळ कशी तंबाखु-सिगारेटची विक्री होत आहे आणि शाळकरी मुलांसह-तरूणांना व्यसनाच्या आहारी टाकलं जात आहे याचा पर्दाफाश नुकताच मुंबई पोलिसांनी केला आहे. कायदा धाब्यावर बसवणाऱ्या मुंबईतील २०० हून अधिक पानटपऱ्यांना पोलिसांनी दणका दिला आहे. १४ जानेवारी ते २७ जानेवारीदरम्यान केलेल्या कारवाईत पोलिसांनी या २०० टपऱ्यांचं शटर डाऊन केलं आहे. तर दुसरीकडे तब्बल ४९ लाख रूपयांची सुगंधित सुपारी, तंबाखुजन्य पदार्थ आणि गुटखा जप्त केला आहे.


१०० मीटरपर्यंत पानटपऱ्यांना बंदी

कॅन्सरसारख्या जीवघेण्या आजारासाठी कारणीभूत ठरणाऱ्या गुटखा, सुगंधित सुपारीवर राज्यात सहा वर्षांपूर्वी बंदी आणण्यात आली आहे. मात्र असं असलं तरी मुंबईत छुप्या पद्धतीनं गुटख्याची विक्री पानटपऱ्यांच्या माध्यमातून होत असल्याचं अन्न आणि औषध प्रशासना (एफडीए)च्या कारवाईतून सातत्यानं समोर येत आहे. गुटखा बंदीच्या कायद्याचं उल्लंघन करणाऱ्या पानटपरीधारकांकडून आता सिगारेट आणि तंबाखूजन्य उत्पादन नियंत्रण कायदा २००३ चंही उल्लंघन करण्यात येत असल्याचं समोर येत आहे. त्यानुसार मुंबई पोलिसांनी शहरातील विविध ठिकाणी १४ ते २७ दरम्यान धडक मोहिम राबवत शाळा-कॉलेजांच्या १०० मीटर परिसरात सिगारेट-तंबाखुची विक्री करणाऱ्या, पानटपऱ्या चालवणाऱ्यांविरोधात कारवाई केली आहे.


कायद्याचं उल्लंघन

या दोन आठवड्याच्या कारवाईदरम्यान २०० पानटपऱ्यांकडून १०० मीटरपर्यंत पानटपऱ्यांच्या कायद्याचं उल्लंघन झाल्याचं निदर्शनास आलं. त्यानुसार या २०० पानटपऱ्यांच शटर डाऊन करण्यात आल्याची माहिती मुंबई पोलिसातील एका वरिष्ठ अधिकाऱ्यानं दिली आहे. तर या टपऱ्यांमध्ये बंदी असलेल्या गुटख्याची आणि सुगंधित सुपारीचीही विक्री होत असल्याचंही समोर आलं. त्यानुसार पोलिसांनी या पानटपऱ्यांमधून ४९ लाख रूपये किंमतीचा गुटखा, सुगंधित सुपारी आणि तंबाखूजन्य पदार्थांचा साठा जप्त केला आहे.


पुन्हा कारवाईला वेग

पोलिसांनी केलेल्या कारवाईतील २०० पानटपऱ्यांपैकी ६० पानटपऱ्या या पश्चिम उपनगरातील आहेत. शाळा-कॉलेजांच्या १०० मीटरपर्यंत परिसरात पानटपऱ्या असतील, पानटपऱ्यांवर गुटख्यासह अन्य तंबाखूजन्य पदार्थांची विक्री होत असेल तर त्याची तक्रार त्वरीत नजीकच्या पोलिस ठाण्यात करावी असं आवाहनही पोलिसांकडून शाळा-कॉलेजांना करण्यात आलं आहे. दरम्यान एका आकडेवारीनुसार २०१७ मध्ये मुंबईतील ९४ पोलिस ठाण्यांच्या माध्यमातून कायद्याचं उल्लंघन करणाऱ्या १२ हजार ६८७ पानटपरीधारकांविरोधात गुन्हे दाखल केले होते. तर १३०६३ जणांना अटकही केली होती. मात्र २०१८ मध्ये ही कारवाई थंडावल्याचं चित्र आहे. कारण २०१८ मध्ये पोलिसांकडून केवळ ९३२३ पानटपऱ्याधारकांविरोधात गुन्हे दाखल करण्यात आले, तर ९५१६ जणांना अटक केली होती. कारवाई थंडावल्यानं पानटपरीधारकांचं फावत होतं. त्यामुळे आता पोलिसांनी पुन्हा कारवाईला वेग देत वर्षाच्या सुरूवातीलाच कायद्याचं उल्लंघन करणाऱ्यांना कायद्याचा दंडुका दाखवला आहे.हेही वाचा -

नागरिकांना लुटणारे दोन तोतये पोलिस पोलिसांच्या जाळ्यात

घाटकोपर विमान दुर्घटनाप्रकरणी मनुष्यवधाचा गुन्हा दाखलRead this story in हिंदी or English
संबंधित विषय