अभिनेता जितेंद्रच्या चुलत भावाची आत्महत्या

 Andheri
अभिनेता जितेंद्रच्या चुलत भावाची आत्महत्या

अंधेरी - अभिनेता जितेंद्र यांचा चुलतभाऊ नितीन द्वारकादास कपूर (58) यांनी अंधेरी (प.) येथील राहत्या इमारतीवरून उडी घेत आत्महत्या केल्याची घटना मंगळवारी दुपारी घडली. वर्सोवा पोलिसांनी या प्रकरणी अपमृत्यूची नोंद केली आहे.

नितीन कपूर हे अभिनेता जितेंद्र यांचे चुलतभाऊ असल्याचे सांगण्यात येत आहे. ते अंधेरी (प.) इथल्या सात बंगला येथील सी ग्लिप्स या इमारतीच्या फ्लॅट क्रमांक 26 मध्ये त्यांच्या बहिणीच्या घरात काही दिवसांपासून राहत होते. 18 वर्षांपासून काहीही कामधंदा न करणाऱ्या नितीन यांना गेल्या दीड वर्षांपासून नैराश्य आले होते. त्यांच्यावर कोकिलाबेन अंबानी रुग्णालयात उपचार सुरू होते. नैराश्येतूनच नितीन यांनी मंगळवारी दुपारी राहत्या इमारतीच्या सहाव्या मजल्यावरील गच्चीचा दरवाजा तोडून तेथून आत प्रवेश केला. त्यानंतर तेथून त्यांनी उडी घेतली. या घटनेची माहिती मिळताच वर्सोवा पोलिसांनी घटनास्थळी जाऊन मृतदेह ताब्यात घेत पुढील कारवाईसाठी रुग्णालयात पाठवला. नितीन यांचे कुटुंबीय हैदराबाद येथे राहत असून त्यांना पोलिसांनी आत्महत्येची माहिती कळवल्याचे सांगण्यात आले.

Loading Comments