म्हाडा, सरकारी बाबूंची अनोखी मैत्री

 Mumbai
म्हाडा, सरकारी बाबूंची अनोखी मैत्री

मुंबई - म्हाडा आणि सरकारी बाबुंची अनोखी मैत्री समोर आली आहे. सरकारी बाबूंच्या स्वप्नातील घर प्रत्यक्षात साकारण्यासाठी म्हाडा वाटेल ते करायला कशी तयार आहे हे ही समोर आले आहे. कलिना येथील कोळे कल्याण येथील म्हाडाच्या मुंबई मंडळाकडून आयएएस अधिकाऱ्यांसाठी बांधण्यात येत असलेल्या मैत्री सोसायटी मध्ये मैत्रीचे अनधिकृत माळे बांधण्यात आले आहेत. माहिती अधिकाराखाली हि माहिती समोर अाली असून ही मैत्री आदर्श मैत्री असल्याचे म्हटले जात आहे.

‌कोळे कल्याण येथे बी.जी.शिर्के या कंत्राटदाराकडून 226 सदनिकांच बांधकाम केले जात आहे. या साठी 36 कोटी 50 लाख इतका खर्च केला जात आहे. प्रवीण दराडे, बिपीन श्रीमाळी, हर्षदीप कांबळे, अभिमन्यू काळे या आयएएस अधिकाऱ्यांसह 86 अधिकारी मैत्रीचे सदस्य आहेत. या मैत्री बाबतची माहिती माहिती अधिकार कार्यकर्ते अनिल गलगली यांनी विचारली होती. त्यानुसार पालिकेकडून देण्यात आलेल्या परवानगी पेक्षा अधिक माळे अनधिकृतपणे बांधण्यात आल्याचे माहिती अधिकाराखाली उघड झाले आहे. इतकेच नव्हे तर हे अनधिकृत बांधकाम अधिकृत करण्याचा प्रस्ताव ही म्हाडाने पालिकेकडे पाठवला आहे.
हा मोठा घोटाळा आदर्श घोटाळ्यासारखाच असल्याचे म्हणत या प्रकरणी कडक कारवाई करण्याची मागणी गलगली यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे. तसंच त्यांनी एमआरटीपी कायद्यानुसार कारवाईची मागणी केली आहे. तर एकीकडे सर्व सामन्यांच्या अनधिकृत इमारतीवर हातोडा मारला जात आहे. आता सरकारी बाबूंच्या अनधिकृत बांधकामावर हातोडा मारणार का असा प्रश्न आता महापालिकेला आणि सरकारला विचारला जात आहे.

Loading Comments 

Related News from क्राइम