पंधरा वर्षांपासून गुंगारा देणारा आरोपी अखेर अटकेत


पंधरा वर्षांपासून गुंगारा देणारा आरोपी अखेर अटकेत
SHARES

गुजरात, सूरत इथल्या एका व्यावसायिकाच्या घरावर दरोडा टाकणाऱ्या आणि एका व्यावसायिकाची हत्या करणाऱ्या आरोपीला तब्बल १५ वर्षांनंतर जेरबंद करण्यात गुन्हे शाखा-८ ला यश आलं आहे. गेल्या १५ वर्षांपासून फरार असलेल्या आणि पोलिसांना गुंगारा देण्यात यशस्वी ठरलेल्या विक्रम ऊर्फ विकी पटेलला नुकतीच गुन्हे शाखेनं पुण्यातून अटक केली असून त्यांची ही कामगिरी मोठी आणि कौतुकास्पद मानली जात आहे. महत्त्वाचं म्हणजे याच गुन्ह्यातील कारागृहात फरार झालेल्या एका आरोपीचा शोध घेत असतानाच या फरार आरोपीच्या संपर्कात विकी असल्याची माहिती गुन्हे शाखेला मिळाली नि विकी त्यांच्या जाळ्यात अडकला.

तर गेल्या काही वर्षांपासून ३ गुन्ह्यांच्या प्रकरणी गुन्हे शाखा-८ चे पोलीस विकीच्या मागावर होते. तेव्हाच विकी गुजरातमधील खळबळ उडवून देणाऱ्या सूरत हत्यांकाडातील आरोपी असल्याची माहिती गुन्हे शाखा-८ ला मिळाली होती. त्यानुसार जेव्हा फरार महेश भोसलेचा शोध घेताना विकीचा पत्ता लागल्याबरोबर गुन्हे शाखा-८ ने विकीच्या मुसक्या आवळत त्याला गुजरातच्या उमर पोलिसांच्या स्वाधीन केलं आहे.


सूरतमध्ये माजवली दहशत

विकी आणि त्याचे अन्य साथीदार अशी एक टोळी होती. या टोळीनं सूरतमध्ये आपली दहशत पसरवण्यासाठी २००४ मध्ये गॅस कंपनीकडून आल्याचं सांगत एका व्यावसायिकाच्या घरात दरोडा घातला. तर त्यानंतर गुंजन शोभना नावाच्या व्यावसायिकाची हत्याही केली. त्यानंतर सूरतच्या उमर पोलिसांनी याप्रकरणी पाच जणांना, विकीच्या साथीदारांना अटक केली. पण विकी मात्र फरार होण्यात यशस्वी झाला.


असा अडकला जाळ्यात

या हत्याकांडाप्रकरणी एका आरोपीला फाशी तर पाच जणांना जन्मठेपेची शिक्षा न्यायालयाकडून सुनावण्यात आली. दरम्यान जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आलेला महेश भोसले हा आरोपी पेरोलवर सुटला. पण पेरोल संपल्यानंतर महेश भोसले तुरूंगात परतलाच नाही. तो गेल्या दहा वर्षांपासून फरार होता. याच महेश भोसलेच्या मागावर गुन्हे शाखेचे पोलिस होते. महेश भोसलेच्या शोधात असलेल्या गुन्हे शाखेच्या हाती अचानक विकीची माहिती लागली. त्यानुसार पोलिसांनी अधिक शोध घेतला असता विकी पुण्यातील चिंतामणी परिसरात असल्याची माहिती मिळाली.


१० वर्षांपूर्वी गुन्हे शाखेनं केली होती अटक

या माहितीनुसार २६ जानेवारीला गुन्हे शाखा-८ च्या पथकानं पुण्यात धाव घेत मोठ्या शिताफीनं विकीला अटक केली आहे. अटकेनंतर गुन्हे शाखा-८ ने विकीला उमर पोलिसांच्या हवाली गेलं असून उमर पोलिस त्यांची चौकशी करत आहेत. दरम्यान विकीला दहा वर्षांपूर्वी गुन्हे शाखा १० ने एका गुन्ह्याखाली अटक केली होती. ­त्यानंतर तो जामिनावर सुटला होता. मात्र त्याला अटक केली तेव्हा आणि तो जामिनावर सुटला तेव्हा विकी सूरत हत्याकांडातील आरोपी होता हे गुन्हे शाखेला माहित नव्हतं. तर पुढेही विकीवर ३ गुन्हे दाखल झाले, तेव्हा गुन्हे शाखेकडून त्याचा शोध सुरू झाला आणि अखेर गेल्या आठवड्यात विकीच्या मुसक्या आवळ्यात गुन्हे शाखेला यश आले आहे.



हेही वाचा -

पुजारीच्या हस्तकांना दणका, मोक्का कायद्यांतर्गत गुन्हा

रुपारेल कॉलेजमध्ये विज्ञान महोत्सवाचं आयोजन



Read this story in हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा