पानसरेंच्या हत्येसाठी वापरलेली शस्त्र

पानसरे हत्येप्रकरणी आतापर्यंत दहा आरोपींना अटक करण्यात आली आहे. यातील दोन आरोपी तपास यंत्रणेपासून दूर आहेत.

पानसरेंच्या हत्येसाठी वापरलेली शस्त्र
SHARES

ज्येष्ठ नेते गोविंदराव पानसरे यांच्या हत्येसाठी वापरलेली शस्त्र मुंबईमधील वाशी इथल्या खाडीत टाकण्यात आली. या शस्त्रास्त्रांचा एसआयटीकडून शोध सुरू करण्यात आलाय. अमेरिकेतील तंत्रज्ञानाची मदत घेऊन शस्त्रांस्त्रांचा शोध घेण्यात येणार आहे. गोविंदराव पानसरे हत्येला पाच वर्षे पूर्ण झाल्यानंतर देखील मुख्य आरोपी आणि हत्येसाठी वापरलेले शस्त्र अद्याप पोलिसांच्या हाती लागलेली नाही. पानसरे हत्येप्रकरणी आतापर्यंत दहा आरोपींना अटक करण्यात आली आहे. यातील दोन आरोपी तपास यंत्रणेपासून दूर आहेत. यासंदर्भात पानसरे कुटुंबियांनी नाराजी व्यक्त केली आहे.


१६ फेब्रुवारी, २०१५ रोजी भाकपचे नेते व ज्येष्ठ विचारवंत कॉ. गोविंद पानसरे व त्यांची पत्नी उमा पानसरे यांच्यावर दुचाकीवरून आलेल्या दोन तरुणांनी गोळ्या झाडल्या, यामध्ये कॉ. पानसरे  यांचा मृत्यू झाला. कॉ. पानसरे यांच्या हत्येप्रकरणी कोल्हापूर एसआयटी पथकाने २०१६ मध्ये समीर विष्णुपंत गायकवाड (३५)  यास  सांगलीतून अटक केली. डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येमध्ये डॉ. वीरेंद्रसिंह शरदचंद्र तावडे त्याला अटक करण्यात आली होती. त्या तपासादरम्यान  तावडे याचे पानसरे यांच्या हत्येमध्येही सहभाग असल्याने त्याला कोल्हापूर पोलिसांनी अटक केली होती. या दोघांच्या चौकशीत विनय बाबुराव पवारला उब्रजच्या,कराड येथून व सारंग दिलीप अकोळकर याला शनिवार पेठ, पुणे येथे रहात असल्याची नावे समजली. मात्र हे दोघेही गुन्हा घडल्यापासून फरारी आहेत. दरम्यान, कर्नाटकातील ज्येष्ठ पत्रकार गौरी लंकेश हत्या प्रकरणाचा तपास करणाऱ्या कर्नाटक एसआयटी पथकाने अमोल काळे या संशयितास पुण्यातून अटक केली. त्याच्याकडे कसून चौकशी केल्यानंतर त्याने दिलेल्या माहितीनुसार  पानसरे व दाभोलकर  यांच्या हत्येत जे हत्यार वापरले होते, तेच पिस्तुल लंकेश हत्येत वापरले आहे. यावरून पानसरे व दाभोलकर यांच्या हत्येत  काळेचा सहभाग असल्याचे तपासात पुढे आले. 


काळे हा २०१४—१५ मध्ये कोल्हापुरात वास्तव्याला होता. कॉ. पानसरे यांच्याविषयी सविस्तर माहिती त्याने मिळवली होती. पानसरेंच्या कार्यक्रमात त्याने विरोध केला होता. कोल्हापुरात त्याचे अनेक सहकारी आहेत. ही माहिती उघड झाल्यानंतर तपासाला वेग आला. मात्र पानसरेंच्या हत्येसाठी वापरण्यात आलेले शस्त्र पोलिसांच्या हाती लागले नाही. हे शस्त्र बहुदा आरोपींना वाशीच्या खाडीत फेकल्याचा संशय एटीएसने वर्तवल्यानंतर त्या शस्त्राचा शोध आता एटीएस घेत आहे. त्यासाठी अमेरिकेच्या तंत्रज्ञानाची मदत घेतली जाणार आहे. या प्रकरणात आतापर्यंत दहा आरोपींना अटक केली आहे.  

संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा