सोन्याच्या २१ तस्करांना मुंबई विमानतळावर अटक


सोन्याच्या २१ तस्करांना मुंबई विमानतळावर अटक
SHARES

सोन्याची तस्करी करणाऱ्या 21 जणांच्या टोळीचा पर्दाफाश हवाई गुप्तचर विभागाने केला आहे. हे सगळे उत्तर प्रदेशमधील एकाच गावचे रहिवासी असून, त्यांच्याकडून गुप्तचर विभागाने 1 कोटी 70 लाखांचं सोनं जप्त केलं आहे.

कशी केली तस्करी?

हवाई गुप्तचर विभागाच्या अधिकाऱ्यांची नजर चुकवण्यासाठी या टोळक्याने अतिशय पद्धतशीरपणे हे सोनं लपवलं होतं. गुप्तचर विभागाच्या अधिकाऱ्यांच्या प्रसंगावधानामुळेच ही टोळी सापडली. सोमवारी रात्री हवाई गुप्तचर विभागाने जेद्दाहवरून जेट एयरवेजच्या फ्लाईट 9W 521 ने आलेल्या तब्बल 21 प्रवाशांच्या घोळक्याला संशयावरून ताब्यात घेतले. त्यांची झडती घेतली असता या सगळ्यांकडे एकूण सोन्याचे 112 तुकडे सापडले. 5 किलो 665 ग्रॅम वजनाच्या या सोन्याची किंमत 1 कोटी 70 लाखांच्या घरात आहे. पिण्याच्या पाण्याच्या बाटल्यांचा या टोळक्यानं तस्करीसाठी वापर केला होता. या बाटल्यांच्या झाकणात आतल्या बाजूने आणि बाटल्यांच्या तळाशी हे सोनं चिकटवून आणलं जात होतं.

हे 21 स्मगलर्स  उत्तर प्रदेशातील रामपूर जिल्ह्याच्या टांडा गावचे रहिवाशी असून, लखनऊ मधील सोन्याच्या तस्कर टोळीसाठी काम करत असल्याचं हवाई गुप्तचर विभागाकडून सांगण्यात आलं आहे. या 21 आरोपींकडील सोनं जप्त करण्यात आलं असून, सगळ्या आरोपींना सध्या जामिनावर सोडण्यात आले आहे. आतापर्यंत करण्यात आलेल्या कारवाईत ही एक मोठी कारवाई असून, संघटित सोनं तस्करी करणाऱ्या एका मोठ्या टोळीचा पर्दाफाश हवाई गुप्तचर विभागाने केला आहे. या प्रकरणाच्या चौकशी दरम्यान मोठे मासे गळाला लागण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा