अभिनेत्री अनन्या पांडे वडिलांसहित एनसीबी कार्यालयात दाखल

अभिनेता चंकी पांडेची मुलगी अनन्या पांडे हिच्या घरी एनसीबीने छापे टाकले असून ती आता चौकशीसाठी एनसीबी कार्यालयात दाखल झाली आहे.

अभिनेत्री अनन्या पांडे वडिलांसहित एनसीबी कार्यालयात दाखल
SHARES

क्रुझवरील अमलीपदार्थांच्या पार्टीप्रकरणी अटकेत असलेला अभिनेता शाहरूख खान याचा मुलगा आर्यन हा नियमितपणे अमलीपदार्थाबाबतच्या बेकायदेशीर कृत्यांमध्ये सहभागी होता आणि त्याचा अमलीपदार्थ विक्रेते आणि पुरवठादारांशी संबंध होता, असे निरीक्षण नोंदवून विशेष सत्र न्यायालयाने बुधवारी त्याला जामीन देण्यास नकार दिला. अमलीपदार्थ प्रतिबंधक कायद्यांतर्गत स्थापन करण्यात आलेल्या विशेष न्यायालयाचे न्यायाधीश व्ही. व्ही. पाटील यांनी आर्यनसह अरबाज मर्चंट आणि मुनमुन धमेचा यांचाही जामीन अर्ज फेटाळला. अशातच आता या प्रकरणी अभिनेता चंकी पांडेची मुलगी अनन्या पांडे हिच्या घरी एनसीबीने छापे टाकले असून ती आता चौकशीसाठी एनसीबी कार्यालयात दाखल झाली आहे.

मुंबई ड्रग्ज प्रकरणात अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान सध्या जेलमध्ये आहे. शिवाय आता अभिनेत्री अनन्या पांडे चौकशीसाठी एनसीबी कार्यालयात दाखल झाली आहे. तिची चौकशीही एनसीबीचे अधिकारी समीर वानखेडे हेच करणार आहेत. अनन्यासोबत तिचे वडील अभिनेता चंकी पांडेदेखील कार्यालयात पोहोचले आहेत.

या चौकशीदरम्यान आपण संपूर्ण सहकार्य करणार असल्याचं चंकी तसंच अनन्याच्या परिवाराने सांगितलं आहे. गरजेची सर्व माहिती आपण एनसीबीला पुरवणार असल्याचं त्यांनी सांगितलं आहे. एनसीबीचे पथक मुंबईच्या वांद्रे येथील बॉलिवूड अभिनेत्री अनन्या पांडेच्या घरी सकाळी पोहोचले होते. या प्रकरणात अजून फारशी माहिती समोर आलेली नाही, पण असे मानले जाते की एनसीबीचा हा तपास आर्यन खान ड्रग्ज प्रकरणाशी संबंधित असू शकतो. अनन्या शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानची मैत्रीण आहे. एनसीबीचे वरिष्ठ अधिकारी व्ही. व्ही. सिंह यांच्या नेतृत्वाखाली शोधमोहिम राबवण्यात येत आहे.

एनसीबीने बुधवारी आर्यन खान आणि उदयोन्मुख बॉलिवूड अभिनेत्रीचे ड्रग्ज चॅट कोर्टात सादर केले होते. त्यामध्ये ड्रग्जबद्दल चर्चा झाली होती. या चॅटच्या आधारे एनसीबीने न्यायालयाकडे आर्यनसह उर्वरित आरोपींच्या रिमांडची मागणी केली आहे.

२ ऑक्टोबर रोजी मुंबईहून गोव्याला जाणाऱ्या क्रूझवर छापा टाकल्यानंतर एनसीबीने प्रथम आर्यन आणि त्याच्या मित्रांना ताब्यात घेतले आणि नंतर त्यांना अटक केली. या प्रकरणात आतापर्यंत २० जणांना अटक करण्यात आली आहे. आर्यन सध्या मुंबईच्या आर्थर रोड जेलमध्ये कैद आहे.

संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा