अॅन्टाॅप हिलमध्ये बलात्कारी भोंदूबाबाला अटक


अॅन्टाॅप हिलमध्ये बलात्कारी भोंदूबाबाला अटक
SHARES

दैवी ताकद असल्याचं भासवून उपचाराच्या नावाखाली २१ वर्षीय तरुणीवर बलात्कार करणाऱ्या भोंदूबाबाला अॅन्टाॅप हिल पोलिसांनी अटक केली आहे. धक्कादायक बाब म्हणजे या भोंदूबाबाने पीडित तरुणीच्या बहिणीलाही अंधश्रद्धेच्या जाळ्यात खेचण्याचा प्रयत्न केला. मात्र पीडितेच्या बहिणीने भोंदूबाबाचा डाव वेळीच ओळखत त्याचा खरा चेहरा उजेडात आणला. या प्रकरणी पीडितेच्या कुटुंबीयांनी अॅन्टाॅप हिल पोलिस ठाण्यात दिलेल्या तक्रारीनुसार पोलिसांनी त्याला अटक केली आहे. धनंजय मिश्रा असं त्याचं नाव आहे.


'अशी' झाली ओळख

मूळचा बिहारचा असलेला आरोपी धनंजय मिश्रा मागील अनेक दिवसांपासून पीडित तरूणीच्या वडिलांच्या सायन कोळीवाडा परिसरात राहणाऱ्या मित्राच्या घरी भाड्याने रहात होता. या मित्राच्या घरी पीडितेच्या वडिलांचं वारंवार येणं-जाणं असल्याने या भोंदूबाबाशी त्यांची ओळख झाली होती. जानेवारी २०१८ च्या पहिल्या आठवड्यात या भोंदूबाबाने मुलीच्या वडिलांना रस्त्यात थांबवत आपल्याकडे दैवी शक्ती असून आपण सांगितलेलं भविष्य कधीच खोटे ठरत नसल्याचा दावा केला.


'असा' केला अत्याचार

पीडित मुलीच्या वडिलांसोबत जवळीक वाढवल्यानंतर हा भोंदूबाबा मुलीच्या घरी या-ना त्या कारणाने जाऊ लागला. दोन्ही मुलींच्या उज्वल भविष्यासाठी त्याने घरात एक पूजा घालण्याबाबत सूचवलं. त्यानुसार एकेदिवशी मुलीच्या कुटुंबीयांना मंदिरात पाठवत, घरी एकट्या असलेल्या २१ वर्षीय पीडितेला महामृत्यूंजय मंत्र म्हणायला लावला आणि संधी साधत तिच्यावर बलात्कार केला. एवढ्यावरच न थांबता. या भोंदूबाबाने पीडितेच्या मोठ्या बहिणीचीही 'शांती' करण्याची इच्छा व्यक्त केली. मात्र या वेळी भोंदूबाबाचा डाव ओळखत मोठ्या बहिणीने पूजेला नकार देत, भोंदूबाबाच्या कृत्याचा पाढा सर्वांसमोर मांडला.

या प्रकरणी पीडितेच्या कुटुंबीयांनी केलेल्या तक्रारीनुसार अॅन्टाॅप हिल पोलिसांनी आरोपी धनंजय मिश्राला अटक केली. न्यायालयाने त्याला पोलिस कोठडी सुनावल्यास एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितलं.



हेही वाचा-

मैत्रीच्या नावाला काळिमा, मित्राचा मृतदेह भिकाऱ्यांमध्ये झोपवून काढला पळ


Read this story in हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा