मैत्रीच्या नावाला काळिमा, मित्राचा मृतदेह भिकाऱ्यांमध्ये झोपवून काढला पळ


मैत्रीच्या नावाला काळिमा, मित्राचा मृतदेह भिकाऱ्यांमध्ये झोपवून काढला पळ
SHARES

दुर्घटनेत जीव गमावलेल्या मित्राच्या मृत्यूचा आळ आल्यास पोलिस कारवाई करतील, या भितीपोटी ४ जणांनी आपल्या मित्राचा मृतदेह रस्त्यावर झोपलेल्या भिकाऱ्यांमध्ये ठेवून त्याचा मृत्यू नैसर्गिकरित्या झाल्याचा बनाव केला. मात्र हा बनाव पोलिसांसमोर फार काळ टिकू शकला नाही. अखेर या प्रकरणात चारही जणांना काळाचौकी पोलिसांनी अटक केली.


नेमकं प्रकरण काय?

काळाचौकीच्या जकारिया बंदरजवळ रस्त्यावर झोपणाऱ्या भिकाऱ्यांमध्ये एक व्यक्ती अंगावर कांब ओढून झोपलेल्या अवस्थेत होता. ९ जानेवारी रोजी सायंकाळी उशीरापर्यंत तो त्याच अवस्थेत होता. त्याच्या शरीराची हालचाल होत नव्हती. शिवाय त्याच्या शरीराची दुर्गंधीही येत असल्याने स्थानिकांनी काळाचौकी पोलिसांना बोलावलं. पोलिसांनी त्याला परळच्या के. ई. एम. रुग्णालयात नेल्यानंतर डाॅक्टरांनी तपासून त्याला मृत घोषित केलं.


सीसीटीव्हीतून उघड

त्या व्यक्तीच्या खिशात मोबाईल व्यतिरिक्त त्याची ओळख पटेल असं काहीही नव्हतं. विशेष म्हणजे मोबाईलमधील सर्व डेटाही उडवण्यात आल्याचं तपासात निदर्शनास आलं. मात्र त्या मृत व्यक्तीच्या मोबाईलवर दोन मिसकाॅल आले होते. पोलिस या सर्व प्रकाराकडे संशयानं बघत होते. त्यानुसार पोलिसांनी संबंधित परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासण्यास सुरूवात केली. त्यानुसार परिसरातील एका सीसीटीव्हीत ४ व्यक्ती मध्यरात्री जकारिया बंदरजवळ मृतदेह ठेवून पळ काढत असल्याचं दिसून आलं. त्यानंतर संबंधित व्यक्तीचा मृत्यू नैसर्गिकरित्या झालेला नाही, तर त्याची हत्या झाली असावी, हा पोलिसांचा संशय बळावला.



'असा' लागला आरोपींचा शोध

मृतदेह ज्या गाडीतून आणण्यात आला, त्या गाडीचा नंबर सीसटीव्हीत कैद झाला होता. त्यानुसार गाडीच्या मालकाला पोलिसांनी बोलावलं. गाडीच्या मालकाने आपण ही गाडी चालवत नसून भाऊ रणधीर ही गाडी चालवत असल्याचं पोलिसांना सांगितलं. चौकशीसाठी ताब्यात घेतलेला रणधीर सुरूवातीला पोलिसांना उडवा उडवीची उत्तरं देत होता. मात्र पोलिसांच्या 'सच बोल पट्ट्या'ने त्याला बोलतं केलं.


कसा झाला मृत्यू?

मूळचा उत्तर प्रदेशमध्ये राहणारा मृत मोहम्मद मन्सूरी आरोपी रणधीर राधाप्रसाद सिंह (२८), बृजेश सोनकर (२९), मयराम रामपाल (४०) आणि मुंगेरीलाल केवट यांच्यासह मुलुंडमधील बांधकाम सुरू असलेल्या इमारतीच्या ठिकाणी मजूर म्हणून कामाला होता. ८ जानेवारीला हे सर्व मजूर रणधीरच्या डंपरमध्ये रेबिट भरून रेबिट टाकण्यासाठी निघाले. सर्व मजूर डंपरमध्ये बसले होते. मात्र गुटखा खाण्यासाठी मोहम्मद डंपरच्या मागच्या बाजूला थांबला होता. सर्व मजूर डंपरमध्ये बसल्याचा विचार करून रणधीरने डंपर मागे घेतला. दुर्दैवाने मागे उभा असलेला मोहम्मद डंपर आणि इमारतीच्या खांबामध्ये अडकला. या दुर्घटनेत त्याचा जागीच मृत्यू झाला.


गुन्ह्याची कबुली

मोहम्मदचा मृत्यू अपघातात झाला असला, तरी पोलिस हत्येच्या गुन्ह्यात अटक करतील, अशी रणधीरला भिती वाटल्याने त्याने मोहम्मदचा मृत्यू नैसर्गिकरित्या झाल्याचं भासवण्यासाठी भिकाऱ्यांमध्ये मोहम्मदला झोपवण्याचा निर्णय घेतला. रणधीरने इतर मजूरांना देखील पोलिस कारवाईची भिती घालत कटात सामील करून घेतलं. त्यानुसार सर्वांनी मिळून मोहम्मदचा मृतदेह जकेरिया बंदरजवळ आणून टाकला. रणधीरने गुन्ह्याची कबुली दिल्यानंतर पोलिसांनी इतर आरोपींना मुंबई सेंट्रल येथून अटक केली.



हेही वाचा-

न्यायाधिशांच्याच घरी झाली चोरी! चोर महिलेस अटक

गाड्या चोरून टूर्स अॅण्ड ट्रॅव्हल्सचा व्यवसाय!


Read this story in हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा