गाड्या चोरून टूर्स अॅण्ड ट्रॅव्हल्सचा व्यवसाय!


गाड्या चोरून टूर्स अॅण्ड ट्रॅव्हल्सचा व्यवसाय!
SHARES

‘खिशात न्हाई आणा, अन् ह्याला बाजीराव म्हणा’ या म्हणीची पूरेपूर प्रचिती पवई परिसरात पहायला मिळाली. शहरातील वजनदार राजकीय पक्षातील नेत्याला गाडी चोरीच्या प्रकरणात पवई पोलिसांनी अटक केली आहे. या चोरीच्या गाड्यांच्या मदतीने त्याने स्वतःचा टूर्स अॅण्ड ट्रॅव्हल्सचा धंदा सुरू केल्याचे तपासात उघड झाले आहे.

मागील अनेक दिवसांपासून शहरातील वाहन चोरीच्या प्रमाणात वाढ झाली होती. मुंबईत दिवसाला ९ ते १० गाड्या चोरीचे गुन्हे घडत असल्याने पोलिसांनी याकडे लक्ष केंद्रीत केले. नुकतीच पवई परिसरातून एक इनोव्हा कार चोरीला गेल्याची तक्रार पवई पोलिस ठाण्यात नोंदवण्यात आली होती.



राजकीय नेताच करायचा चोरी!

या गुन्ह्याचा तपास करताना पवईतीलच एक राजकीय नेता वाहनांची चोरी करून त्या गाड्या अथर्व टूर्स अॅण्ड ट्रॅव्हल्सच्या व्यवसायासाठी वापरत असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार पोलिसांनी अथर्व टूर्स अॅण्ड ट्रॅव्हल्स कंपनीकडे चौकशी केली असता चोरीला गेलेली इनोव्हा त्याच्याकडे सापडली. या प्रकरणी पोलिसांनी अथर्व टूर्स अॅण्ड ट्रॅव्हल्स कंपनीचा मालक सतीश बनसोडेवर गुन्हा नोंदवून अटक केली.

वाहन चोरी प्रकरणात सतीश बनसोडेला पवई पोलिसांनी अटक केली होती. शहरातील चोरीची वाहने त्याने स्वतःच्या टूर्स अॅण्ड ट्रॅव्हल्सच्या व्यवसायासाठी वापरल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. न्यायालयाने त्याची जामिनावर मुक्तता केली आहे.

अनिल फोपाले, वरिष्ठ पोलिस निरीक्षक, पवई


३० हजार रूपयात चोरी

सतीशने चोरीचे काम करणाऱ्यांना पैसे देऊन वाहने चोरी करायला लावत असे. नंतर त्या वाहनांचे नंबर बदलून तो आपल्या व्यवसायासाठी वापरत होता. पवईमधून इनोव्हा कार चोरी करण्याचे काम त्याने तीस हजार रुपये देऊन फिल्टरपाडा येथील एका व्यक्तीला दिल्याची कबुली पोलिसांना दिली आहे. कार चोरी करणाऱ्याचा पोलिस शोध घेत असून त्याची ओळख पोलिसांना पटलेली आहे. त्या फरार आरोपीवरही विविध गुन्ह्यांची नोंद आहे. आतापर्यंत पोलिसांनी सतीशकडून चोरीची इनोव्हा कार, साकीनाका येथून चोरी केलेली स्विफ्ट डीजायर आणि एक सुमो अशा ३ गाड्या हस्तगत केल्या आहेत.



हेही वाचा

मुलुंडमध्ये 'गोलमाल'चा 'उंगलीमॅन'!


Read this story in हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा