सुका पाशाचा ताबा अाता मुंबईच्या खंडणी विरोधी पथकाकडे


सुका पाशाचा ताबा अाता मुंबईच्या खंडणी विरोधी पथकाकडे
SHARES

नाशिक शस्त्रास्त्र प्रकरणात अटकेत असलेला मुख्य आरोपी बद्रीजुम्मन अकबर बादशाह उर्फ सुका पाशा याचा ताबा बुधवारी मुंबईच्या मुंबईच्या खंडणी विरोधी पथकाच्या अधिकाऱ्यांनी घेतला. सुका पाशावर रफी अहमद किडवाई (आरएके) पोलीस ठाण्यात खंडणीचा गुन्हा नोंद करण्यात आला आहे. याच गुन्ह्यांत पोलिसांनी त्याला अटक दाखवली असून शिवडीच्या मोक्का न्यायालयाने त्याला २४ जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.


सुटकेसाठी ५ लाखांची खंडणी

शिवडी परिसरात राहणाऱ्या सुकापाशावर यापूर्वीही गंभीर गुन्ह्यांची नोंद आहे. काही दिवसांपूर्वीच सुका पाशा आणि अकबर बाप-लेकाची जेलमधून जामीनावर सुटका झाली होती. जेलमधून बाहेर पडण्यासाठी त्यांनी मोठ्या प्रमाणात पैशांची उधळण केली होती. हा खर्च भागवण्यासाठी आणि परिसरात दहशत बसवण्यासाठी सुका पाशाने त्याच परिसरातील एका व्यक्तीकडे ५ लाखाची खंडणी मागितली होती. व्यावसायिकाने पैसे देण्यास नकार दिल्याने सुका पाशा आणि त्याचे वडील अकबर यांनी दुकानावर जाऊन बंदूक दाखवत त्याला धमकावले होते. याबाबत त्या व्यावसायिकाने आरएके पोलीस ठाण्यात लेखी तक्रार नोंदवली होती. त्यानुसार पोलिसांनी गुन्हा नोंदवत अधिक तपासासाठी मुंबईच्या खंडणी विरोधी पथकाकडे सोपवला होता. याच गुन्ह्यांचा तपास करण्यासाठी पोलिसांनी सुका पाशाचा ताबा मागितला अाहे.


३० पेक्षा अधिक गुन्ह्याची नोंद

सुकापाशाच्या चौकशीतून अनेक गंभीर गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता पोलिसांकडून वर्तवली जात आहे. सुका पाशावर ३० पेक्षा अधिक गंभीर गुन्ह्यांची नोंद आहे. या गुन्ह्यांमुळे सुकाविरोधात मोक्कानुसार गुन्हा दाखल करण्याचा मार्ग मोकळा होणार असल्याचे एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले.


यूपीमध्ये टाकला होता दरोडा

काही दिवसांपूर्वीच सुका पाशाने अापल्या साथीदारांसह उत्तर प्रदेशमध्ये शस्त्रविक्री करणाऱ्या दुकानावर दरोडा टाकत २२ रायफल, १७ रिव्हाॅल्वर, आणि चार हजार १४२ काडतुसे चोरली होती. ही शस्त्रास्त्रं मुंबईत आपल्या साथीदारांना देऊन मुंबईवर वर्चस्व मिळवण्याचा त्याचा कट होता. आतापर्यंत सुकापाशावर नोंद असलेल्या प्रत्येक गुन्ह्यांची माहिती घेऊन पोलिस त्याचे डोजिअर बनवणार असल्याची माहिती गुन्हे शाखेचे पोलिस उपायुक्त दिलीप सावंत यांनी दिली.

Read this story in हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा