पॅरोलवर बाहेर पडलेला डॅडी रडारवर

  Pali Hill
  पॅरोलवर बाहेर पडलेला डॅडी रडारवर
  मुंबई  -  

  मुंबई - दगडी चाळीमध्ये छापा टाकून अनिल पिसाळ (४६) याला ११ लाखांच्या रोख रकमेसह ताब्यात घेतल्यानंतर याप्रकरणी दाखल गुन्ह्यामध्ये गँगस्टर अरूण गवळी उर्फ डॅडी पोलिसांच्या रडावर आला आहे. गुन्ह्याच्या तपासामध्ये गवळीकडंही चौकशी करण्यात येणार असल्याच्या वृत्ताला मुंबई पोलीस दलातील उच्चपदस्थ अधिकाऱ्यांनी दुजोरा दिला आहे. काही दिवसांपूर्वीच डॅडी नागपूर जेलमधून बाहेर आला होता. त्यामुळं दगडी चाळीमध्ये पुन्हा एकदा पैशाचे व्यवहार सुरू झाल्याची चर्चा आहे.

  गवळी टोळीसाठी काम करणाऱ्या पिसाळ यानं ही टोळी सोडल्यानंतर दादर परिसरात भाजी विक्रीचा व्यवसाय सुरू केला होता. रविवारी रात्री एका व्यक्तीकडून त्यानं ११ लाख रुपयांची रोकड घरी आणल्याची माहिती आग्रीपाडा पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक जोस्ते यांना मिळाली होती. त्यानुसार आग्रीपाडा पोलिसांच्या एका विशेष पथकानं सोमवारी सायंकाळी पिसाळ याच्या दगडी चाळीतील घरावर छापा टाकून ११ लाख रुपयांच्या रोख रकमेसह त्याला ताब्यात घेतले. आरोपीला भारतीय दंड विधान ४१ ड कलमान्वये अटक करण्यात आल्याचं पोलीस उपायुक्त प्रविण पडवळ यांनी सांगितलं.

  गवळी टोळीसाठी काम करणारा आरोपी पिसाळ हा पोलीस अभिलेखावरील सराईत गुन्हेगार असून मारहाण, दंगल आणि अपहरणाचे असे चार गंभीर गुन्हे त्याच्याविरोधात दाखल आहेत. गवळी पॅरोलवर घरी आल्यानंतर ही रोकड आणली गेल्यानं पोलिसांनी या दिशेनं तपास सुरू केला आहे. आरोपीच्या चौकशीतून समोर येणाऱ्या माहितीनुसार पुढील कारवाई करण्यात येणार असल्याचं पोलिसांनी सांगितलं.

  Loading Comments

  संबंधित बातम्या

  © 2018 MumbaiLive. All Rights Reserved.