SHARE

जामीन देण्याच्या बदल्यात आरोपीकडून प्रिंटर मागणाऱ्या शिवाजीनगर पोलीस ठाण्याच्या सहाय्यक पोलिस निरीक्षकाविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे. सतीशचंद्र राठोड (३७) असं या पोलिस निरीक्षकाचं नाव असून सध्या या प्रकरणाची चौकशी सुरू असल्याचं लाचलुचपत प्रतिबंधक विभाग (एसीबी) कडून सांगण्यात आलं आहे.


आरोपीनं केली तक्रार

आरोपीला शिवाजीनगर पोलिस ठाण्यात हजेरी लावण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालयानं दिले होते. आदेशानुसार आरोपी हजेरी लावण्यासाठी शिवाजीनगर पोलिस ठाण्यात जात असे. तिथे त्या आरोपीची ओळख सहाय्यक पोलिस निरीक्षक सतीशचंद्र राठोड यांच्याशी झाली. आरोपीने आपल्याला जामीन मिळवून देण्याची मागणी सतीशचंद्र यांच्याकडे केली. पण जामीन देण्याच्या बदल्यात सतीशचंद्र राठोड यांनी प्रिंटरची मागणी केली. लाच देण्याची इच्छा नसलेल्या आरोपीनं थेट लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली.


तपास सुरू

तक्रारीची शहानिशा केल्यानंतर सहाय्यक पोलिस निरीक्षकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती एसीबीच्या अधिकाऱ्यांनी दिली आहे. अद्याप या प्रकरणी सहाय्यक पोलिस निरीक्षकाला अटक करण्यात आलेली नसून तपास चालू असल्याचं एसीबीच्या अधिकाऱ्यांनी सांगितलं.


संबंधित विषय
ताज्या बातम्या