चेंबूर पोलीस ठाण्यात स. पोलीस उपनिरीक्षकाची आत्महत्या


चेंबूर पोलीस ठाण्यात स. पोलीस उपनिरीक्षकाची आत्महत्या
SHARES

चेंबूर पोलीस ठाण्यातील (Chembur police station) सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक संपत गाढवे (५८) यांनी पोलीस ठाण्यातील भंडारगृहात गळफास लावून आत्महत्या (sucide) केल्याचा प्रकार सोमवारी दुपारी उघडकीस आला आहे. लाॅकडाऊनच्या पार्श्वभूमीवर एका बाजूला पोलीस कर्मचाऱ्यांवर ड्युटीचा ताण असतानाच ही दुर्दैवी घटना घडल्याने हळहळ व्यक्त होत आहे.

चेंबूर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संपत गाढवे यांना घशाचा कर्करोग होता. फेब्रुवारी २०१९ मध्ये त्यांच्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली होती.  आजारी असलेल्या गाढवे यांना भंडारगृहाची ड्युटी देण्यात आली होती. ही घटना घडली तेव्हा बहुतेक सर्व पोलीस कर्मचारी बंदोबस्तासाठी बाहेर गेलेले होते. त्यानंतर सोमवारी दुपारी १२ च्या सुमारास बदली हवालदार कर्तव्यास आले असता, त्यांना गाढवे यांनी भंडारगृहातील लोखंडी राॅडला ओढणीच्या सहाय्याने गळफास घेतल्याचं आढळून आलं. त्यानंतर त्यांचा त्वरीत खाली उतरवून नजीकच्या राजावाडी रुग्णालयात नेण्यात आलं. तिथं डाॅक्टरांनी त्यांना मृत घोषित केलं. 

गाढवे यांच्या शर्टच्या खिशात एक चिठ्ठी सापडली असून यामध्ये आजाराला कंटाळून जीवन संपवित असून यासाठी कुणालाही जबाबदार धरू नये, असं गाढवे यांनी नमूद केलं आहे.

गाढवे यांच्या मागे पत्नी व दोन मुले असा परिवार आहे. विशेष म्हणजे मे महिन्यात गाढवे निवृत्त होणार होते. चेंबूर पोलिसांनी या प्रकरणी अपघाती मृत्यूची नोंद केली असून अधिक तपास सुरू आहे. 

संबंधित विषय