SHARE

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे चेंबूरचे विभागप्रमुख कर्णबाळा दुनबळे यांच्यावर शनिवारी रात्री १० वाजेच्या सुमारात अज्ञात इसमांनी प्राणघातक हल्ला केला. दुनबळे यांच्यावर धारदार तलवारीने हल्ला चढवण्यात आला. या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या दुनबळे यांना त्वरीत सायन रुग्णालयात दाखल करण्यात आलं. सद्यस्थितीत त्यांची प्रकृती स्थिर असल्याचं समजत आहे.


कसा झाला हल्ला?

दुनबळे राहत असलेल्या घराजवळ सिंधी सोसायटीत हा प्रकार घडला. रात्री १० वाजेच्या सुमारास १० ते ११ जाणांच्या गटाने दुनबळे यांच्यावर लोखंडी रॉड, तलवारीने हल्ला केल्याचा मनसे कार्यकर्त्यांचा दावा आहे. मात्र अद्यापपर्यंत या हल्ल्याचं नेमकं कारण समजू शकलेलं नाही. या प्रकरणी चेंबूर पोलिस फरार आरोपींचा शोध घेत आहेत.


मनसे पदाधिकाऱ्यांचे राजीनामे

महत्त्वाचं म्हणजे दुनबळे यांच्या कामकाजाला कंटाळून गेल्या आठवड्यात मनसे चेंबूर शाखाध्यक्ष आणि इतर पदाधिकाऱ्यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्याकडे राजीनामे दिले होते.

गेल्याच महिन्यात शिवसेना आमदार तुकाराम काते यांच्यावरही मानखुर्दमध्ये प्राणघातक हल्ला झाला होता.

संबंधित विषय
ताज्या बातम्या