14 वर्षांच्या नरकयातनेतून सुटका !

 Lokhandwala
14 वर्षांच्या नरकयातनेतून सुटका !

मुंबई - लहान मुलींना विकत घेऊन त्यांना वेश्याव्यवसायात जुंपणाऱ्या एका टोळीचा गुन्हे शाखेने पर्दाफाश केलाय.  १४ वर्षांपासून वेश्याव्यवसायात जुंपलेल्या एका मुलीची सुटका करून गुन्हे शाखेने खरोखरच तिचा वनवास संपवला. या प्रकरणी पोलिसांनी जितेंद्र ठाकूर, विमल ठाकूर, अंजू आणि पूनम या ठाकूर कंपनीला बेड्या ठोकल्या आहेत. या मुलीची १४ वर्षांच्या वनवासाची  कहाणी ही खरोखरच अंगावर काटा आणणारी आहे. वयाच्या दहाव्या वर्षीच जास्मिनला(बदललेले नाव) विकले गेले.  मुंबईला येताच या ठाकूर नराधमांनी तिला घरकामात जुंपले. जशी जास्मिन मोठी होऊ लागली, तशी या ठाकूर कंपनीचे खरे रूप समोर आले. या ठाकूर बहीण भावांनी वयात येताच  जास्मिनला बारमध्ये नाचण्यास भाग पाडले, आणि तिला वाममार्गाला जाण्यास भाग पाडले. वेश्याव्यवसायासाठी तिला दुबईला देखील पाठवण्यात आले. या सर्व काळात जास्मिनची मोठ्या प्रमाणात पिळवणूक झाली.  १४ वर्षांनी का होईना पण एक आशेचा किरण जास्मिनच्या आयुष्यात आला. या देवदूताने तिला या अंधारातून बाहेर काढले आणि पोलिसात जाण्यासाठी तिला धीर देखील दिला. 'जास्मिनची तक्रार येताच गुन्हे शाखा युनिट ९ ने अंधेरीतील लोखंडवाला येथील त्यांच्या अड्ड्यावर धाड टाकली आणि या ठाकूर कंपनीला बेड्या ठोकल्या'.आता जास्मिन आपली ओळख पूर्णत:बदलून नव्याने आयुष्याला सुरुवात करीत आहे.

Loading Comments