सावधान! मुंबईत नेपाळी दरोडेखोर सक्रिय


सावधान! मुंबईत नेपाळी दरोडेखोर सक्रिय
SHARES

मोठमोठ्या सोसायट्यांमध्ये सुरक्षारक्षकाची नोकरी करायची. त्याच बहाण्याने संपूर्ण परिसराची टेहळणी करायची अाणि दरोडे टाकायचे. अशाच एका प्रयत्नात दरोडे टाकण्याच्या प्रयत्नात असलेल्या ११ नेपाळ्यांना गुन्हे शाखा ५ च्या पोलिसांनी अटक केली आहे. सुरक्षारक्षकाला बांधून ही टोळी दुकानांमधील मौल्यवान दागिने लंपास करायची. नुकताच दादरच्या वामन हरी पेठे येथील ज्वेलर्सवर ही टोळी दरोडे टाकण्यासाठी आली असताना त्यांचा प्रयत्न फसला आणि पोलिसांनी या टोळीच्या मुसक्या आवळल्या.



दरोडा टाकताना रंगेहाथ पकडले

दादर पश्चिमच्या गोखले रोडवर असलेल्या वामन हरी पेठे ज्वेलर्सवर काही जण दरोडा टाकण्यासाठी येणार असल्याची माहिती गुन्हे शाखा ५ च्या पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार बुधवारी पहाटे पोलिसांनी त्याठिकाणी सापळा रचला होता. १२ ते १३ नेपाळी तरुणांची टोळी संशयास्पद फिरताना दिसली. त्यांच्या हातात स्कू ड्रायव्हर, कटावणी, गॅस कटर, पक्कड, पाने होते. ही टोळी दुकानाचे कुलुप कापण्यात मग्न असताना पोलिसांनी त्यांना रंगेहाथ पकडले. त्यावेळी पोलिस आणि नेपाळी चोरांमध्ये झालेल्या झटापटीत दोन चोर पळून जाण्यात यशस्वी ठरले.


दरोडेखोरांवर विविध ठिकाणी गुन्हे दाखल

पोलिसांंनी तब्बल १० जणांवर शिवाजी पार्क पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदवत त्यांना अटक केली आहे. या आरोपींचा ताबा गुन्हे शाखेच्या पोलिसांंनी घेतला आहे. हे सर्व चोर अभिलेखावरील असून त्यांच्यावर मुंबईच्या विविध पोलिस ठाण्यांमध्ये चोरी, दरोड्याच्या गुन्ह्यांची नोंद आहे. हे सर्व आरोपी झारखंड आणि नेपाळचे असून रात्रीच्या वेळी गस्तीवर असलेल्या सुरक्षारक्षकाला बांधून दुकानात चोरी करायचे. या आरोपींची अधिक चौकशी सुरू असून पोलीस त्यांच्या इतर साथीदारांचा शोध घेत आहेत.

Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा